Type Here to Get Search Results !

अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगट योजना ; अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती ; ४ हजार बचतगटांद्वारे महिलांचे होणार सक्षमीकरण ; ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित, कर्जासाठी प्रतिवर्ष ५ कोटी रुपये



अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगट योजना ; अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती ; ४ हजार बचतगटांद्वारे महिलांचे होणार सक्षमीकरण ; ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित, कर्जासाठी प्रतिवर्ष ५ कोटी रुपये


मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी पुढील ५ वर्षांकरीता स्वयंसहाय्यता बचतगट योजना राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या योजनेसाठी अंदाजे ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) ही योजना राबविण्यात येईल. या योजनेसंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील १२ शहरांमध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी सध्या बचतगट योजना राबविली जाते. ३१ मार्च २०२० रोजी या योजनेची मुदत संपली. आता या योजनेस १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, मालेगाव (नाशिक), कारंजा (वाशिम), परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा – कौसा (ठाणे) आणि मिरज (सांगली) या १२ शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येईल.


योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद

या योजनेसाठी अंदाजे ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी लोकसहभागाचा ८.२८ कोटी रुपये निधी वगळता २५.६२ कोटी रुपयांचा निधी, तसेच अमरावती जिल्ह्याकरिता नवीन लोकसंचलीत साधन केंद्र (सीएमआरसी) तयार करण्याकरिता १.९६ कोटी रुपये असे एकूण २७.५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनामार्फत या निधीची तरतूद करण्यात येईल. याशिवाय मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत बचतगटांना प्रतिवर्ष ५ कोटी रुपये इतके कर्ज वाटप करण्याचेही प्रस्तावित असल्याचे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.


८०० नवीन बचतगटांद्वारे ८ हजार ८०० महिलांचे संघटन

या योजनेतून पुढील ५ वर्षात नव्याने तयार होणाऱ्या ८०० बचतगटांद्वारे ८ हजार ८०० महिलांचे संघटन उभे करण्यात येईल. नवीन बचतगटातील महिलांना संकल्पना प्रशिक्षण व बुक किपींगचे प्रशिक्षण देण्यात येईल. तर जुन्या गटातील सभासदांची व्यावसायिक कौशल्यवृद्धी करण्याच्या अनुषंगाने ३ हजार २०० गटांपैकी प्रती गट ५ याप्रमाणे सुमारे १७ हजार सदस्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. नवीन व जुन्या गटांना बँकेमार्फत पतपुरवठा व वैयक्तिक उद्योगांना चालना देण्यात येईल. यासाठी बँक मित्र ही संकल्पना राबविण्यात येईल. याशिवाय सद्यस्थितीत असलेल्या १३ लोकसंचलीत साधन केंद्रांचे (सीएमआरसी) बळकटीकरण करण्यात येईल, तर अमरावती जिल्ह्यात एक नवीन सीएमआरसी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १.९६ कोटी रुपये इतकी अतिरिक्त अंदाजपत्रकीय तरतूद अपेक्षित आहे.


३२ हजार महिलांना उद्योजकीय प्रशिक्षण

या योजनेंतर्गत महिलांना उद्योजकीय प्रशिक्षणही देण्यात येणार असून सुमारे ३२ हजार महिलांना उद्योजक म्हणून तयार करण्याचे नियोजन आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या तज्ञ संस्थेने विकसित केलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण मोड्युलच्या आधारे हे प्रशिक्षण देण्यात येईल. याशिवाय महिलांची शैक्षणिक पात्रता वाढविणे, आरोग्य व पोषण आहाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठीही कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


बचतगटांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक युगाशी स्पर्धा करु शकेल असे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी महिलांना मार्केटींग, जाहिरात, लेबलिंग, पॅकेजिंग इत्यादी बाबींचे प्रशिक्षण आवश्यक आहे. पुढील ५ वर्षात नवीन निर्माण होणारे ८०० बचतगट आणि सध्या कार्यरत ३ हजार २०० बचतगटातील महिलांना याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येईल, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies