प्रामाणिकपणे सेवा करूनही कौतुकाची थाप फार कमी वेळा मिळते : आमदार दत्तात्रय सावंत ; म्हसवड येथे जिल्हास्तरीय कृतिशील व उपक्रमशील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

प्रामाणिकपणे सेवा करूनही कौतुकाची थाप फार कमी वेळा मिळते : आमदार दत्तात्रय सावंत ; म्हसवड येथे जिल्हास्तरीय कृतिशील व उपक्रमशील पुरस्कार वितरण सोहळा संपन्नप्रामाणिकपणे सेवा करूनही कौतुकाची थाप फार कमी वेळा मिळते : आमदार दत्तात्रय सावंत ; म्हसवड येथे जिल्हास्तरीय कृतिशील व उपक्रमशील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न  


म्हसवड/अहमद मुल्ला : जिल्हास्तरीय कृतिशील व उपक्रमशील पुरस्काराने म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजला सन्मानित करण्यात आले. 
जिल्हास्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण पुणे विभाग म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कुल येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांचे हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ऑडिटर मोझर, सातारा जिल्हा कृती समितीचे संपर्क प्रमुख मारुती गायकवाड, उपाध्यक्ष अरुण पवार, फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हरनिंग कौन्सिलचे सदस्य व शाळा समितीचे व्हाईस चेअरमन श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, सदस्य श्रीमंत शिवराज राजेमाने, विपुल दोशी, सिद्धनाथ हायस्कुलचे प्राचार्य एम.जी. नाळे, मुख्याध्यापक संघाचे माजी माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.यावेळी आम. दत्तात्रय सावंत म्हणाले, शिक्षकांच्या आयुष्यात संपूर्ण नोकरीत प्रामाणिकपणे सेवा करूनही कौतुकाची थाप फार कमी वेळा मिळते. अनेकांची पूर्ण नोकरी संपली तरी तसा क्षण त्यांच्या आयुष्यात येत नाही. सुरवातीला राज्य पातळीवर नंतर जिल्हा पातळीवर व आता तालुका पातळीवर कृती समितीच्या माध्यमातून विविध पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. या पुरस्कारासाठी निवड करताना कोणताही प्रस्ताव न मागवता खरोखर जे चांगले काम करतात त्यांची निवड केली गेली आहे. पुरस्कार वितरणाची ही परंपरा कायम सुरू ठेवण्यात येईल असेही यावेळी आम. सावंत यांनी सांगितले.

यावेळी श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने म्हणाले, कृती समितीने कृतीशील व उपक्रमशील शाळा म्हणून आमच्या सिद्धनाथ हायस्कुलची निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या विद्यालयास उपक्रम व कृतिशील राहण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटी नेहमीच अग्रेसर असते. त्याचप्रमाणे देसाई ब्रदर्स,पुणे व वनराई सामाजिक संस्था पुणे यांचेही नेहमीच योगदान असते. शिक्षकांच्या पूर्ण नोकरीच्या कालावधीत प्रामाणिकपणे सेवा करूनही शाबासकीची थाप मिळत नाही हे ओळखून शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून ज्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांचे काम असेच आदर्शपणे सुरू ठेवुन इतरांपुढे आदर्श ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी मुख्याध्यापक टी जी भोसले, टाकेवाडी हायस्कुलचे मुख्याध्यापक नदाफ, सर्वलिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरड, काळचौंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव, आत्मगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माने, सिद्धनाथ हायस्कुलच्या उपमुख्याध्यापिका सौ.आर.एल. मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कृतिशील शाळा हा पुरस्कार सिध्दनाथ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड, ता. माण, जि. सातारा या विद्यालयास देण्यात आला आहे. कृतिशील मुख्याध्यापक हा पुरस्कार मेटकरी अयुबखान शेखलाल, भैरवनाथ विद्यालय तोंडले, ता.माण,जि. सातारा यांना देण्यात आले आहे. कृतिशील शिक्षक हा पुरस्कार बापूसाहेब महादेव वाघमारे यांना देण्यात आला असून ते श्री काळभैरव विद्यालय काळचौंडी तालुका माण जिल्हा सातारा या विद्यालयात काम करतात, कृतिशील शिक्षिका सौ.रेखाताई प्रल्हाद पवार यांना देण्यात आला असून त्या परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी.ता.माण. जि. सातारा. येथे नोकरीस आहेत. कला व क्रीडाशिक्षक हा पुरस्कार महेश वसंत बडवे यांना देण्यात आला असून ते जय भवानी विद्यालय पिंगळी बु.।। ता. माण जि. सातारा येथे नोकरीस आहेत. तर कृतिशील शिक्षकेत्तर कर्मचारी हा पुरस्कार गोरड दुर्योधन विलासराव यांना देण्यात आले असून ते श्री जानुबाई विद्यालय,विरळी.ता. माण जि. सातारा येथे लेखनिक म्हणून काम करतात. यावेळी रेखाताई पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. तर प्रास्ताविक बाळासाहेब जाधव यांनी व उपस्थितांचे आभार एम.जी. नाळे यांनी मानले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise