अजनाळे गावात कोरोनाचा राजकीय संसर्ग ; स्थानिक नेतेमंडळींनी फिरवली गावाकडे पाठ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

अजनाळे गावात कोरोनाचा राजकीय संसर्ग ; स्थानिक नेतेमंडळींनी फिरवली गावाकडे पाठ


अजनाळे गावात कोरोनाचा राजकीय संसर्ग ; स्थानिक नेतेमंडळींनी फिरवली गावाकडे पाठ
माणदेश एक्सप्रेस न्यूज
अजनाळे/सचिन धांडोरे : देशामध्ये  कोरोना या संसर्गजन्य विषाणूने  धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातही  कोरोना संसर्ग  वाढला आहे. अजनाळे ता. सांगोला. जि. सोलापूर येथे ग्रामसेवक, गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, आरोग्य सेवक, हे गावामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राजकीय हेवे विसरून खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. मात्र अजनाळे गावातील काही स्थानिक नेते नेतेमंडळींचा अपवाद वगळता गावावर दुर्लक्ष का करीत आहेत? असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे. 
अजनाळे गावांमध्ये ५२७८ लोकसंख्या असून  ग्रामपंचायत सदस्य १३ तर वार्ड पाच आहेत. गेल्या दोन महिन्याच्या काळामध्ये किती ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या वार्ड मध्ये जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या हा संशोधनाचा विषय आहे. गावामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांनावरती कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. भविष्यकाळात जर यातून कोरोनासारखी महामारी गावात आली तर याला जबाबदार कोण? ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक आश्वासने दिली जातात. लाखो रुपये खर्च केले जातात. पण गावावर संकट आल्यावर मात्र गाव रामभरोसे सोडले जात आहे ही मोठी शोकांतिका आहे. गावामध्ये गाव कृती समिती असून या समितीने गावावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु काही ठराविक अधिकारी गावांमध्ये येऊन फोटोबाजी  करून जातात. परंतु त्यानंतर गावामध्ये कोण येतंय कोण जातंय याची माहीती ठेवणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. मुंबई, पुणे व अन्य शहरांतून गावामध्ये जवळपास १८० नागरिक आले आहेत. या आलेल्या नागरिकावरती बारीक लक्ष ठेवले पाहीजे. सध्या गावातील स्थानिक पुढाऱ्यांनी गावामध्ये राजकारण न करता कोरोना  या सारख्या भयानक अशा आजाराला नियंत्रण राखण्यासाठी सर्वांनी मिळून गावाची काळजी घेतली पाहिजे. परंतु काही स्थानिक पुढारी जाणून-बुजून गावांमध्ये राजकारण करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अजनाळे गावची सुरक्षा रामभरोसे ठरत आहे. वेळीच ही परिस्थिती आटोक्यात आली नाहीतर गावाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise