Type Here to Get Search Results !

विदर्भ-मराठवाड्यातील कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ लाभ द्या ; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; बँकर्स समितीची बैठक बोलवण्याची मागणी


विदर्भ-मराठवाड्यातील कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ लाभ द्या 
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; बँकर्स समितीची बैठक बोलवण्याची मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : विदर्भ-मराठवाड्यातील कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ लाभ द्या या मागणीचे पत्र विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले असून तात्काळ राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक बोलवण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्णतः ठप्प झालेली आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तर नगण्य झाली आहे. केवळ १९ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे दि. २२ मे २०२० रोजीच्या शासकीय आदेशात नमूद आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज दिसत असल्याने त्यांना नवीन कर्ज सद्धा मिळणार नाही आणि परिणामी आगामी खरीप हंगामाला सामोरे जाताना त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल.
अशा शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज देण्यासाठी बँकांनी शासनाकडून येणे बाकी' असे दाखवण्याबाबत आपण जीआर काढला आहे. मात्र, असे जीआर काढून उद्देश सफल होईल, याची शक्यता कमीच आहे. आपल्याला जर खरोखर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, असे वाटत असेल तर तत्काळ राज्यस्तरिय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक बोलावावी आणि सर्व बँकांना विश्वासात घेऊन याबाबतची कारवाई करावी लागेल. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून त्यांच्याकडून तसे आदेश निर्गमित झाल्यासच असे करणे शक्य होणार आहे.
आज सर्व बँकांचे काम हे ऑनलाईन चालते. कोअर बँकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये 'शासनाकडून येणे बाकी' अशा कॉलमची तरतूद नाही. त्यामुळे या जीआरचा कितपत उपयोग होईल, हे सांगणे कठीण आहे. रिझर्व्ह बँकेमार्फत या सूचना सर्व बँकांना गेल्या तरच त्याचा उपयोग होईल. त्यामुळे एसएलबीसीची बैठक बोलावून, सर्वांना विश्वासात घेऊन या आदेशांची अंमलबजावणी केली तर ते अधिक संयुक्तिक आणि प्रासंगिक ठरेल. अशी बैठक आपण तत्काळ बोलवावी, अशी विनंती पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies