स्वतःची प्रत्येक जबाबदारी स्वीकारणे हेच महिलांचे सक्षमीकरण - डॉ. निशिगंधा माळी स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८८ वी जयंती साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, January 4, 2020

स्वतःची प्रत्येक जबाबदारी स्वीकारणे हेच महिलांचे सक्षमीकरण - डॉ. निशिगंधा माळी स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८८ वी जयंती साजरी.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतिनिधी :  आरोग्याच्या दृष्टीने मुलींनी जागरूक राहून निरोगी जीवन जगण्यासाठी योग्य आहार घ्यावा. धाडसीपणा अंगी बाळगून आपल्या मर्यादांचा स्विकार करणे हेसुद्धा एक प्रकारचे सक्षमीकरणच आहे. स्वतःचे संरक्षण स्वतः करताना नेहमी सकारात्मक विचार करून मुलींना स्वतःच्या मर्यादा आणि अधिकारांची जाणीव होणे आवश्यक आहे. मुलींनी शिक्षणातून आपल्या विचारांची उंची वाढवली पाहिजे. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचे अवलोकन करत असताना मुलींनी समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे आवश्यक आहे तसेच त्यांनी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. स्वतःची प्रत्येक जबाबदारी स्वीकारणे हेच महिलांचे खरे सक्षमीकरण आहे. समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर आपण आपल्या विचारांमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंब आणि नोकरी यांमध्ये समन्वय साधणे देखील महिलांना आवश्यक आहे. यशस्वी जीवन जगत असताना आपल्या दृष्टिकोनातूनच आपला विकास होत असतो.असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सौ. निशिगंधा माळी (कोल्हे) यांनी केले.
 गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सौ. निशिगंधा माळी (कोल्हे) ह्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करत होत्या. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. यशपाल खेडकर यांनी प्रास्तविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार म्हणाले की ‘स्त्री-पुरुष प्रमाण  समजून घेवून स्वेरीच्या विद्यार्थिनींनी रोल मॉडेल बनावे, तसेच मुलींनी आज स्वतः सक्षम होणे गरजेचे असून त्यांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे.’ असे आवाहन केले. पुढे आपल्या भाषणात डॉ. माळी यांनी स्वेरीतील विद्यार्थिनींना आपल्या दैनंदिन जीवनाविषयी अतिशय मौलिक मार्गदर्शन करून जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ ह्या त्यांच्या वैचारिक प्रबोधनाने समाज अधिक प्रगल्भ करत आहेत असे सांगितले. यावेळी ऐश्वर्या बेताळे, प्रगती मुळे, साक्षी यमगर, स्मिता हांडे यांनी आपल्या मनोगतात ‘शिक्षण हे समाजाला जागे करण्याचे साधन असून, स्त्रियांना त्याची जास्त आवश्यकता आहे. हे ओळखून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले असे अनेक महत्वपूर्ण विचार मांडले. वसतिगृह व्यवस्थापक व कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांनी १६ मुलींपासून वसतिगृहाची सुरवात झाली असून आजतागायत १२०० मुली वसतिगृहात एकोप्याने रहात असून मुलांची व मुलींची स्वतंत्र अशी एकूण सहा वसतिगृहे  झाली असल्याची माहिती दिली. यावेळी बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर.गिड्डे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतिश लेंडवे, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहातील सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चाळकीकर यांनी केले तर प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. डी.एस. चौधरी यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment

Advertise