प्रा.सुनिल दबडे यांची बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

प्रा.सुनिल दबडे यांची बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.

माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : दि. 31 डिसेंबर 2019 रोजी साहित्यनगरी कोंडवे (कोकण) येथे होणाऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गोमेवाडी ता. आटपाडी येथील सुपुत्र जेष्ठ साहित्यिक प्रा.सुनील दबडे यांची निवड झाली आहे. ते कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय देवापुरचे माजी विद्यार्थी आहेत. गोमेवाडी सारख्या ग्रामीण भागातून शिक्षणाचे धडे घेऊन शिक्षणाची ज्ञानगंगा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आपल्या साहित्यातून पोहचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
या अगोदर त्यांना 2006 साली  कृष्णा साहित्य भूषण पुरस्कार, 2007 साली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, 2012 साली आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड, 2015 चा उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार, 2017 ला रत्नागिरी येथे बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड, राजापुर तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष म्हणून हि त्यांनी योगदान दिले आहे. आटपाडी तसेच कोकणातील ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलनाचे भरीव कार्य त्यांनी केले आहे.
ते उत्कृष्ट साहित्यिक व लेखक असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने ग्रामीण जीवनातील भीषण वास्तवता, माणसा माणसातील न बदलू पाहणारी मानसिकता, दुर्लक्षित समाज मनाचे विविध कांगोरे त्यांनी ' हराटीची भुई व उन्हातल्या सावल्या या कथा संग्रहातून महाराष्ट्राचा ग्रामीण बाज रेखाटला आहे. तसेच गावपंढरी या कथा संग्रहातून भौतिक सुविधांच्या गर्दीतून गावपण जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ते एक उत्तम शिक्षक, लेखक, कवी, वक्ता म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी शिक्षणाचा टिळा हा बालकविता संग्रह लिहला आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व घटकांच्या माथ्यावर ठळकपणे शिक्षणाचा टिळा लावून शिक्षणप्रक्रिया आनंददायी करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कोकणच्या लाल मातीत विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम करून विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी वाढवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या या माणदेशाच्या सुपुत्राची बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने माणदेशातून विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच माणदेश उच्च शिक्षित, साहित्यिकांची  खाण असल्याचे दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise