सातबारा संगणकीकरणासाठी महसूल यंत्रणेचे विशेष शिबीर ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; पहिला टप्पा पूर्ण, दुसरा टप्पा ४ डिसेंबर पासून. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

सातबारा संगणकीकरणासाठी महसूल यंत्रणेचे विशेष शिबीर ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; पहिला टप्पा पूर्ण, दुसरा टप्पा ४ डिसेंबर पासून.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सन 2018-19 मधील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच जुलै ते ऑगस्ट या महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पाऊस यामुळे नियमित महसूल कामे प्रलंबित राहिली आहेत. यामध्ये सातबारा संगणकीकरणाची कामे देखील प्रलंबित राहिलेली आहेत. त्यामुळे क्षेत्रिय स्तरावरून फेरफार नोंदी, सातबारा संगणकीकरण याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. या सर्व तक्रारींचा झपाट्याने निपटारा करून कामे सुरळीत करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्कल, तलाठी अशा सर्वच महसूल यंत्रणा यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सदरची शिबीरे ही दोन टप्प्यात राबविण्यात येत असून टप्पा क्रमांक एक हा २८ ते ३० नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यात आला आहे. तर दुसरा टप्पा ४ ते ७ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. दिनांक ४, ५, ६, ७ डिसेंबर रोजीही तहसिल स्तरावर पूर्णवेळ शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरांमध्ये तहसिलदार, उपअधिक्षक भूमि अभिलेख, सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व परीरक्षक भूमापक उपस्थित रहात आहेत. शिबीराच्या कालावधीत पूर्ण दिवसभर कार्यालयीन वेळेत नियोजित हॉलच्या बाहेर न जाता फेरफार नोदींच्या निर्गती, १५५ आदेश निर्गती, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील कलम २५७ च्या आदेश निर्गती व अन्य महसूलशी संबंधित कामे जागेवरच करण्यात येत आहेत. पूर्ण जिल्ह्यातील सर्व तहसिलमध्ये शिबीर कालावधीत एकाच वेळी कामकाज होईल याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम तालुक्यातील शिबीरांच्या ठिकाणी अचानकपणे भेट देवून कामाची पहाणी करत आहेत. सर्व तहसिलदार नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याबाबत दक्षता घेत असून कोणीही गैरहजर रहाणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येत आहे. क्षेत्रिय स्तरावरील शिबीरांमध्ये तहसिलदार स्वत: पूर्णवेळ उपस्थित रहात आहेत. संबंधित उपविभागीय अधिकारी शिबीरामध्ये उपस्थित राहून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 257 चे आदेश निर्गमित करण्यासाठीच्या प्रक्रियेशी संबंधित कामकाजाचे नियोजन करत आहेत. जनतेच्या कामांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने या शिबीरांना अनन्य साधारण महत्व असून या कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
सातबारा संगणकीकरण, पी.एम. किसान, अवकाळी मदत अनुदान वाटप हे विषय प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हास्तरावरून तालुक्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून यामध्ये उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया जाधव– तासगाव, कवठेमहांकाळ, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.६ सांगली) विजय देशमुख – पलूस, कडेगाव, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) विवेक आगवणे – मिरज, जत (संख), उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती देशमुख – वाळवा (आष्टा), उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ९ सांगली) बाबासो वाघमोडे – शिराळा, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरविंद लाटकर – खानापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे – आटपाडी यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Advertise