Type Here to Get Search Results !

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात पूरप्रवण गावातील युवकांनी सहभागी व्हावे: जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली मार्फत गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण जीवन मुक्ती सेवा संस्था कोल्हापूर (व्हाईट आर्मी, कोल्हापूर) यांच्या प्रशिक्षकांमार्फत दिनांक १६ ते २५ डिसेंबर २०१९ या कालावधीत गावस्तरावर चार पथका मार्फत घेण्यात येणार आहे. पूरप्रवण गावातील युवकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचे (१५-२०) गावस्तरावर गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करण्यात येवून गावामध्ये येणाऱ्या आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याकामी हे दल उपयुक्त राहील. प्रशिक्षणकामी पहिल्या टप्प्यात मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या तालुक्यातील ५२ पूरप्रवण गावांची प्राधान्याने निवड करण्यात आलेली आहे. यासाठी नदीकाठच्या गावातील युवकांनी तलाठी यांच्याशी संपर्क साधून नावे नोंद करावीत. या प्रशिक्षणामध्ये पूरप्रवण गावामध्ये आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन, शोध व सुटका पध्दती, प्रथमोपचार पध्दती, बोट चालविणे इत्यादी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार असून तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका, होमगार्ड इत्यादी गावस्तरावरील अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्वाचा भाग म्हणून तातडीने गावस्तरावरील आपत्तीस प्रतिसाद देण्याकामी गाव आपत्ती प्रतिसाद दल तयार करणे हा उद्देश असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या दलास गावातील आपत्तीस सामोरे जाण्याकामी आवश्यक आपत्कालीन साहित्य देवून त्याचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे. मिरज – दिनांक १६, १७, १८, १९, २० व २१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत अनुक्रमे निलजी, माळवाडी, दुधगाव, ढवळी, अंकली व कसबे डिग्रज येथे तर दुपारी ३ ते ६.३० या वेळेत अनुक्रमे बामणी, पदमाळे, समडोळी, जुनी धामणी, हरीपूर व मौजे डिग्रज येथे.
पलूस - दिनांक १६, १७, १८, १९, २०, २१ व २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत अनुक्रमे ब्रम्हनाळ, भिलवडी, बुर्ली, सुखवाडी, सुर्यगाव, तुपारी व नागराळे येथे तर दुपारी ३ ते ६.३० या वेळेत अनुक्रमे अंकलखोप, तावदरवाडी, आमणापूर, चोपडेवाडी, रोडेवाडी, पुणदीवाडी व पुणदी वाळवा येथे.
वाळवा - दिनांक १६, १७, १८, १९, २०, २१, २३, २४ व २५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत अनुक्रमे बोरगाव, बनेवाडी, भरतवाडी, शिरटे, रेठरे हरणाक्ष, वाळवा, ऐतवडे खुर्द, हुबालवाडी, ताकारी येथे तर दुपारी ३ ते ६.३० या वेळेत अनुक्रमे ताकारी, साटपेवाडी, कणेगाव, नरसिंहपूर, बिचूद, जुनेखेड, चिकूर्डे खुर्द, तांबवे व कृष्णानगर येथे.
शिराळा - दिनांक १६, १७, १८ व १९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत अनुक्रमे सागाव, देववाडी, आरळा व कांदे येथे तर दुपारी ३ ते ६.३० या वेळेत अनुक्रमे मांगले, पुनवत, मराठेवाडी व कोकरूड येथे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies