Type Here to Get Search Results !

नागरिकांनी कीटकजन्य आजाराबाबत सतर्क राहावे : एकनाथ बोधले ; स्वेरीत ‘किटकजन्य रोग नियंत्रणा’वर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून किटकजन्य रोग नियंत्रणाबाबत कार्यक्रम घेणे व जनजागृती करणे आदी उपक्रम सुरू असून अलीकडच्या वातावरणामध्ये डासाची उत्पत्ती वाढून विविध आजार होत आहेत. नगरपरिषद व ग्रामपंचायत ठोस पाऊले उचलत आहेत. तरी देखील सुज्ञ नागरिकांनी डेंग्यू मलेरिया अशा आजाराबाबत सतर्क राहावे. यासाठी विविध उपाय योजना सुरु आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीने देखील दखल घेतली असून ग्रामीण पातळीवर विविध उपाय योजना सुरु आहेत. अशा सामाजिक कार्यशाळेसाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी रोंगे सरांचे सातत्याने सहकार्य लाभत आहे.’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी केले. 
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीमध्ये सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ‘किटकजन्य रोग नियंत्रणा’वर एकदिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी हिवताप अधिकारी डॉ.एकनाथ बोधले हे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना डेंग्यु व मलेरिया बाबत सतर्क राहण्यासाठी मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी उपस्थितांनी २६/११ मधील सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहिली व उपस्थितांना संविधानाची शपथ दिली. जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख म्हणाले की, ‘आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा उपचारापूर्वीच त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजारावर नियंत्रण ठेवता येते. असे सांगून येथील आरोग्य विभागात उत्तमपणे काम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने केवळ फॉगिंग मशीन आणून उपयोग नाही तर त्यावर ठोस उपाय करावेत.’ अशा देखील सूचना त्यांनी केल्या. आरोग्य समितीचे सभापती अतुल खरात यांनी ‘डेंग्यु’ आजारावर नियंत्रण कसे करावे व त्यावर कोणती उपाय योजना करावी? हे सांगून ग्रामीण भागातील मानसिकता पाहता ‘फॉगिंग मशीन’आणून उपयोग नाही तर डेंग्यूवर ठोस उपाय करण्याची गरज आहे.’ असेही सांगितले. प्रा. सुभाष माने म्हणाले की, ‘डेंग्यु आणि तत्सम आजारांचे निदान करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे.’ स्वेरीचे संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘समता’ शब्दाचा अर्थ सांगून ‘संस्कृती’ बाबतीत सुंदर विवेचन केले. पंढरपूर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक गावात वाडी-वस्त्यांवर फवारणीसाठी फॉगिंग मशीन आणण्याच्या सूचना करून  मलेरिया व डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. संपूर्ण दिवसभर स्वेरीमध्ये ग्रामीण भागात फोफावणाऱ्या आजारावर ‘प्रात्यक्षिक, उपाय योजना आणि घ्यावयाची काळजी’ याबाबत जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सिव्हील विभागाचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी पुण्यातील राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, पंचायत समिती सदस्य देवकुळे, स्वेरीचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, पालक संघाचे आबासाहेब दैठणकर यांच्यासह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सूत्रसंचालन केले तर डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies