मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1 जानेवारीपासून. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 31, 2019

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1 जानेवारीपासून.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगली : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 ते 15 जानेवारी  हा कालावधी प्रतिवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्याचा निर्णय दिनांक 22 जुलै 2015 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांना दि. 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्याबाबत दिनांक 3 डिसेंबर  2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. 
राज्यामध्ये मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे व  त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींचा सक्रीय सहभाग असावा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे फलक सर्व कार्यालयांनी लावावेत. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज 100 टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर, त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनी मराठीचा वापर करणे अनिवार्य असल्याचे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. 
मराठी भाषेसंबंधी वाड्.मयासंबधी विविध परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबीरे, कवी संमेलन, एकांकिका, बालनाट्ये, नाटके, पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्य पुरस्कार वितरण यांचे आयोजन, मराठी भाषेत निबंध, प्रश्नमंजुषा, कथा कथन, चारोळी लेखन, कथा लेखन, कविता लेखन, हस्ताक्षर, शुध्दलेखन, वक्तृत्व, घोषवाक्ये, अभिवाचन, वादविवाद, अंताक्षरी, काव्यशास्त्र विनोद स्पर्धा, मराठी भाषेतील तज्ज्ञ व्यक्ती, लेखक, वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन, नामवंत लेखकांना बोलावून संवाद लेखकांशी अशा स्वरूपाचा कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्य वाचन, माहितीपट आदि साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise