Type Here to Get Search Results !

मुलतत्ववादाला विरोधाची क्षमता संविधानात : श्यामसुंदर सोन्नुर.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रशांत केंगार : सध्या समाजात धर्मवाद व जातीयवादीने उग्र स्वरूप धारण केले आहे. धर्मांध विचारांनी देशाचे अखंडत्व धोक्यात आणले आहे. देशद्रोही विचारांचे समूळ उच्चाटन व्हावे. सनातनीच्या मुलतत्ववादी विचारप्रवाहात देशातील बहुजन, महिलावरील अत्याचार वाढले आहेत. तेंव्हा या मुलतत्ववादी विचारांना विरोध करण्याची क्षमता फक्त संविधानातच आहे. असे विचारमत संविधान कीर्तनकार व जेष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नुर महाराज यांनी व्यक्त केले. 
आटपाडी येथील संविधान सप्ताह जनजागृती व्याख्यानमाला कार्यक्रमाचे सहावे विचारपुष्प श्यामसुंदर सोन्नुरमहाराज यांनी गुंफले. यावेळी महाराज बोलत होते.विचारमंचावर कार्यक्रम अध्यक्ष नंदकुमार केंगार उपस्थित होते.
 सोन्नुर महाराज पुढे म्हणाले, ज्या काळामध्ये माणसाला हीन लेखले जात होते. माणसाला काडीचे मूल्य नव्हते. अशा काळात समाजपरिवर्तनाची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दिली. जातीय विषमतेमुळे खचलेल्या समाजाला जगण्याचे सामर्थ्य दिले. देशात गेली साठ वर्षाहून अधिक काळ वैचारिक व सामाजिक परिवर्तनाची चळवळ चालू आहे. ही चळवळ फुले-शाहू-आंबेकडर विचारधारेने प्रेरित असून त्यांनी दिलेल्या तत्वावर चालत आहे. देशात पूर्वीपासून समाजात बदल घडविण्याचे कार्य साहित्य करीत आहे. बदल घडविणे ही साहित्याची जबाबदारी आहे. परिवर्तनवादी साहित्य व विचार मांडणाऱ्याना व समाज प्रबोधन करणाऱ्यांना धर्माध व्यवस्था संपवित आहे. परिवर्तनवादी विचार साहित्याला संपविले असल्याने लोकशाही धोक्यात आहे. ती वाचवणे आपले कर्तव्य असुन त्यासाठी देशात राज्यकर्ते बदलण्याची गरज आहे.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष नंदकुमार केंगार म्हणाले, केंद्राने संविधान जनजागृती सप्ताह हा  राष्ट्रीय सप्ताह जाहीर करावा. देशभर सात दिवसांच्या सप्ताहात प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत. लोकशाहीत संविधान महत्वाचा पायाभूत घटक असून देशाची कार्यप्रणाली संविधान कलमानुसार चालते. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाहीची त्रिसूत्री आहे. संविधानाने वंचीत दलितांना पुरोहितांच्या गुलामगीरीतून मुक्त केले आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. माणसाला माणसात आणण्याचे कार्य संविधानाच्या माध्यमातून डॉ.आंबेडकर यांनी केले. बहुजन त्यांचे उपकार तहयात विसरू शकणार नाहीत. त्यांच्या संविधान पुस्तकाला घराघरात जागा द्या.
यावेळी विचारमंच अध्यक्ष राजेंद्र खरात, रणजित ऐवळे,  लक्ष्मण मोटे, दीपक खरात, श्याम ऐवळे, सुरेश मोटे, राहुल काटे उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन धनंजय वाघमारे प्रास्ताविक राजेंद्र खरात, आभार जनार्दन मोटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies