Type Here to Get Search Results !

आटपाडीतील डेंग्यू प्रश्नी सांगलीत बैठक; जिल्हा आरोग्य अधिकारी गिरी गोसावी यांनी उपाय सूचना संदर्भात दिल्या सूचना.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडी शहरातील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी 14 टिमा तयार करण्यात आल्या आहेत. डेंग्यू प्रतिबंध उपाय योजना करण्यासाठी आटपाडी ग्रामपंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी गिरी गोसावी यांनी दिली. आटपाडीमध्ये डेंग्यू उपाय योजना संदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे व सरपंच सौ. वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ साधना पवार, गट विकास अधिकारी मधुकर देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उमाकांत कदम, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
आटपाडी शहरात नोव्हेंबर महिन्यात अकरा डेंग्यू झालेले रुग्ण आढळले. त्यात शाळकरी मुलगी निकिता बाळासाहेब चव्हाण व व्यापारी गणेश विठोबा सागर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासन गडबडून जागे झाले. ग्रामपंचायतीने गाव स्वच्छता करावी, गटारी तुंबलेल्या काढाव्यात, पाण्याचा निचरा करावा, डास प्रतिबंधक योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी गिरी गोसावी यांनी सांगितले. डॉ उमाकांत कदम यांनी आटपाडी शहराच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची डेंग्यू संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 26 ठिकाणी गप्पी मासे सोडले आहेत. 23 जागी जळके ऑईल गटारीच्या डबक्यात टाकले आहे. सिमेंट टाक्या साफ करण्यासाठी मालकाला लेखी पत्र दिले आहे. आटपाडी शहरातील दोन भंगार डेपोना भेट देऊन त्यांना उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याना लेखी पत्र देऊन डेंग्यूची माहिती शासनास कळवावे, वेळेत उपचार करावेत. एक लाखापेक्षा कमी पेशी असणाऱ्या रुग्णांना आटपाडीत उपचार न करता अधिक उपचारासाठी सांगलीत पाठवावे. अपार्टमेंट मधील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मालकांना लेखी पत्रव्यवहार केला आहे. टायरमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू डास वाढत असल्यामुळे शहरातील रस्त्यावर घराशेजारी व इतर पडलेले टायर जमा करून त्यांचे विल्हेवाट लावावी. गप्पी माशांचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्रातून वाटप सुरू केले आहे. खाजगी रुग्णालयात ऑक्टोंबर महिन्यात 4 डेंगू रुग्ण आढळले तर नोव्हेंबर महिन्यात 8 रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची तब्येत आता सुधारली आहे.
आटपाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणाल्या, आटपाडी शहरात वाडीवस्तीवर सर्वत्र डास प्रतिबंधक फवारणी सुरू आहे. आटपाडी ग्रामपंचायतीने दोन धूर फवारणी यंत्र विकत घेतली आहेत, दोन भाडोत्री धूर फवारणी यंत्र घेऊन धूर फवारणी युद्धपातळीवर सुरू केले आहे. आटपाडी शहरातील कायमस्वरूपी स्वच्छता राहावी यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या फंडातून गटार बांधकाम मंजूर करण्यात आली आहेत. असे त्या म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies