Type Here to Get Search Results !

पराभव दिसल्याने पवारांनी माघार घेतली : नरेंद्र मोदी : विजयसिंह मोहिते-पाटलांचा मोदींकडून सत्कार

पराभव दिसल्याने पवारांनी माघार घेतली : नरेंद्र मोदी
विजयसिंह मोहिते-पाटलांचा मोदींकडून सत्कार
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : शरद पवार निवडणुकीच्या मैदानात ओपनिंग बॅटसमन म्हणून आले, परंतु बारावा गडी म्हणून न खेळताच बाहेर पडले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील पवारांच्या माघारीची खिल्ली उडवली.
अकलूज (ता. माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.  यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा आम्ही दिली. सिंचन विद्युतीकरण यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. ऊस उत्पादकांचे भले लक्षात घेता त्यांच्या उत्पन्नाची साधने आम्ही वाढवत आहोत. इथेनॉलच्या उत्पन्नासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.  हे सर्व शरद पवार करू शकले असते, परंतु आपली साखरेची दुकाने सुरळीत चालावित, यासाठी त्यांनी या बाबींकडे लक्ष दिले नाही. पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
राजकीय जीवनातली 50 वर्ष ही फार मोठी असतात. विजयसिंह मोहिते-पाटील यांची 50 वर्षाची कारकीर्द आहे. अशा विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची स्तुती करत सत्कार केला. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर आले. यामुळे त्यांचा यावेळी मोदींच्या हस्ते सत्कार केला. अकलूज येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप-शिवसेनेचे इतर नेते उपस्थित होते.
यावेळी मोदी म्हणाले की, जे दिल्लीत बसले आहेत, त्यांना जमिनीवरील सत्य माहिती नाही. ही गर्दी त्या लोकांनी पाहावी, मग त्यांच्या लक्षात सत्य स्थिती येईल. मला आता लक्षात आलं की, शरदराव यांनी मैदान का सोडलं. ते मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधी हवेच रूप ओळखतात. दुसरं कुणी बळी गेलं तरी चालेल पण ते आपल्या परिवाराचं आणि आपलं नुकसान कधी होऊन देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले, अशा शब्दात त्यांनी यावेळीही मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
भाजपा-राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केलेल्या माढा मतदारसंघामध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा होत झाली. भाजपाच्यासभेच्या या मंचावर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उघडपणे उपस्थिती लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अकलूज येथील सभेत खासदार विजयसिंह मोहिते- पाटील, सुधाकरपंत परिचारक, आमदार निलम गोरे, कांचन कुल, आ. प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते- पाटील,  चंद्रकांत पाटील, शहाजी पवार, उत्तम जानकर आदींची उपस्थिती आहे. तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आ. नारायण पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे शिवाजी सावंत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies