दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह चौघे गजाआड ; १९ मोटर सायकली जप्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, March 5, 2019

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह चौघे गजाआड ; १९ मोटर सायकली जप्त


दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह चौघे गजाआड ; १९ मोटर सायकली जप्त
 सोलापूर/प्रतिनिधी: सोलापूर  ग्रामीण v जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या विविध हद्दीबरोबरच पुणे आणि सातारा जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या दुचाकी मोटारसायकलींपैकी १९ मोटारसायकलींचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात दुचाकी चोर नामदेव बबन चुनाडे (वय-४४, रा. अनिल नगर,पंढरपूर) याच्यासह चौघांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून ७ लाख ५० हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, गतवर्षी २०१८ मध्ये जिल्ह्यात ४६६  व जानेवारी २०१९ अखेर ६५ दुचाकी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सदर दुचाकी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करणेसाठी विशेष पथक नेमण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोनि अरुण सावंत यांनी स्था.गु.शा. कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष पथक नेमले होते.
 त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी पो.उ.नि. हेमंत भंगाळे, पोलीस हवालदार महमंद इसाक मुजावर, नारायण गोलेकर, गोरक्षनाथ गांगुर्डे, मोहन मनसावले, पो.कॉ. अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, सचिन मागाडे आणि खंडू माळी यांना पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढा बायपास रस्त्यावर एक संशयित इसम स्प्लेंडर प्रो. या दुचाकीवर थांबलेल्या संशयितासंबंधी संशय बळावल्याने त्यास गराडा घालून पकडले. प्रारंभीच्या चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याची कसून चौकशी करता, सोलापूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे रॅकेट उजेडात आल्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
आरोपी नामदेव बबन चुनाडे असून त्यांने जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून दुचाकी मोटारसायकली चोरून ऋषिकेश विनोद वाडेकर (रा.अनिल नगर,पंढरपूर), रंजित सौदागर पवार (रा.रहाटेवाडी,मंगळवेढा) आणि भाग्योदय उर्फ बबलू दामोदर काळुखे (रा.मंगळवेढा) यांच्यामार्फत विक्री केल्याचेही सांगितले. या माहितीनुसार नामदेव चुनाडे याच्यासह चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 
नामदेव चुनाडे याने चोरलेल्या दुचाकी ते त्रिकुट फायनान्सच्या गाड्या असल्याची बतावणी करुन विक्री करीत होते. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या विकलेल्या ०८ युनिकॉर्न, ०९ हिरो स्प्लेंडर,०१ होंडा शाईन आणि ०१ अॅक्टिव्हा अशा १९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या सर्व दुचाकी पुढील कार्यवाहीसाठी अकलूज पोलीस ठाण्याकडे देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही चौकडी सध्या पोलिस कस्टडीत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही अपर पोलिस अधीक्षक झेंडे यांनी व्यक्त केली.

आरोपी नामदेव चुनाडे याच्याविरुध्द  चोरी, घरफोडीचे ३१ गुन्हे दाखल
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामदेव चुनाडे याच्याविरुध्द चोरी, घरफोडीचे ३१ गुन्हे दाखल आहेत. तो दीड वर्षापूर्वी कारागृहातून जामीनावर बाहेर आला आहे. रात्रीच्या अंधारात दुचाकी चोरीसाठी खास बनविलेल्या बनावट चावीने दुचाकीचे लॉक उघडून चोरी करण्याची त्याची पद्धत होती. त्याच्या घरावर दीड महिन्यापासून पाळत ठेवल्यावर तो स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्याचेही अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise