Type Here to Get Search Results !

आटपाडी येथील जि.प.शाळेच्या इमारतीस आग : संपूर्ण खोल्या व शाळेचा दस्ताऐवज जळून खाक ; कोणतीही जीवितहानी नाही

आटपाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दुपारी अचानक आग लागली.
आटपाडी येथील जि.प.शाळेच्या इमारतीस आग
संपूर्ण खोल्या व शाळेचा दस्ताऐवज जळून खाक ; कोणतीही जीवितहानी नाही
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 च्या जुन्या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये शाळेच्या खोल्यांना आग लागून इमारतीचे मोठे नुकसान झाले. आटपाडीतील एसटी बस स्थानकासमोर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. यामध्ये शाळा नं. १ व शाळा नं. २ अशा दोन वेगवेगळ्या दोन शाळा आहेत.  या शाळेच्या पाठीमागील बाजूस पूर्वेकडे तोंड करून तीन खोल्या आहेत. यामध्ये अडगळीचे साहित्य, बाकडे, टेबल-खुर्च्या, जुनी कागदपत्रे आदि साहित्य ठेवले होते. काल दुपारी दीडच्या दरम्यान आग लागली. आटपाडीचा आठवडा बाजार असल्याने रस्त्यालगत असणाऱ्या  या शाळांच्या खोल्यांमधून आग व  धूर निघत असल्याचे लक्षात येताच सर्वांनी शाळेकडे धाव  घेतली.
शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी शाळेतून मुले घरी गेली होती. शाळा खोल्यांना कुलुपं लावली होती. आग लागल्याचे  समजताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, शाळेतील शिक्षक, पोलीस ठाणे, पंचायत समिती यांना कळवले. माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक बी.जी. कांबळे, सभापती हर्षवर्धन देशमुख, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे, ॲड. धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य,  एसटी. बस स्थानकावरील सफाई कामगार, प्राथमिक शाळेतील शिक्षक, कर्मचारी, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पाण्याचा ट्रक व टॅंकर आणून आगीवर पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न दोन-तीन तास सुरू होता. आगीने उग्र स्वरूप धारण केल्यामुळे दोन खोल्या, पत्रे, खिडकी, दरवाजे व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले.  आग तिसऱ्या खोलीपर्यंत पोहोचली,  त्यावेळी खोलीतील साहित्य बाहेर काढून आगीपासून संरक्षण करण्यात आले. आग लागल्याचे  कळताच सांगोला, विटा येथील अग्निशामक वाहन मागविण्यासाठी निरोप देण्यात आले परंतु ही वाहने नादुरुस्त असण्याची कारणे सांगितली गेली. त्यामुळे स्थानिक पाण्याचे टँकर मागवूनच आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


दत्तात्रय पाटील (पंच) यांचे सहकार्य
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 ला आग लागल्याचे आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व लोकप्रिय नेते दत्तात्रय पाटील (पंच) यांना समजताच, त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली व येताना रस्त्याच्या कडेला असणारा पाण्याचा टॅंकर त्यांनी आणला व आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बदलीने पाण्याचा मारा केला. आटपाडी बसस्थानक येथील पाणी मारण्याचे मशीन आणण्यात आले व त्याद्वारे आगीवर पाण्याचा फवारा मारण्यात येवू लागला. परंतु आगीवर नियंत्रण येत नसल्याचे लक्षात आल्यावर पाणी मारण्यासाठी त्यांनी एचटीपी मागवून त्याद्वारेही पाण्याचा फवारा चालू केला. त्यावेळी त्यांनी पंचायत समितीला संपर्क करून १२ हजार लिटर पाण्याचा टॅकर मागविला होता.

सभापती हर्षवर्धन देशमुख यांची तातडीने भेट
आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांना सदरची घटना समजताच त्यांनी तातडीने जिल्हा परिषद शाळेकडे धावा घेतली व परिस्थितीची पाहणी करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते.

निर्लेखन बाकी होते
जिल्हा परिषद शाळा नं. 1 च्या असणाऱ्या या खोल्या मोडकळीस आल्या होत्या. त्या ठिकाणी ही शाळा भरत नव्हती. सदरच्या खोल्यांचे निर्लेखन करण्यासाठी पंचायत समिती आटपाडी कडील शिक्षण विभागाकडे प्रस्तावही दिला होता. परंतु मोडकळीस आलेल्या खोल्यांचे निर्लेखन केले गेले नाही.

आग विझवण्यासाठी शिक्षिकांची धडपड
ज्या शाळेच्या खोल्यांना आग लागून खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्या ठिकाणी आगींचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु लागलेली आग विझवण्यासाठी शाळा नं. 1 येथे ज्ञानदानाच्या कार्य करणाऱ्या शिक्षिका यांची आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालू होती. आग लागलेल्या ठिकाणापासून पाण्याचा टॅकर थोडा लांब असल्यामुळे तेथून बादलीने पाणी आणून आग विझवण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies