Type Here to Get Search Results !

आटपाडीच्या वादग्रस्त बीडीओंची बदली: सत्ताधारी गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह अन्य राजकीय मंडळींनीही त्यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीमुळे तक्रारी केल्या होत्या.

आटपाडीच्या वादग्रस्त बीडीओंची बदली
 माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर : आटपाडी पंचायत समितीच्या वादग्रस्त गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची बदली पाटण येथील पंचायत समितीच्या रिक्त पदी करण्यात आली आहे. याबाबत शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बदलीचे आदेश काढले आहेत.
आटपाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून मीना साळुंखे गेल्या चार वर्षापासून ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांची गेल्यावर्षीच बदली होणे अपेक्षित असतानाच, त्यांच्या बदलीबाबत वर्षभर चालढकल झाली. त्यांची आटपाडी पंचायत समितीमधील बहुतांशी कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यांच्याविरोधात पदाधिकारी व जनमानसातून संतापाची लाट उसळली होती तर अधिकारी व कर्मचारी यामधून अंतर्गत कुजबुज चालू होती. सत्ताधारी गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह अन्य राजकीय मंडळींनीही त्यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीमुळे तक्रारी केल्या होत्या. विहिरीचे प्रस्ताव मंजूर करताना अडवणूक करणे, विशिष्ट कामात लक्ष घालून ते जोमाने करणे तर सामान्य लोकांच्या कामांमध्ये व्यत्यय आणणे यासारखे आरोप त्यांच्यावर करण्यात येत होते. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांच्या कार्यप्रणालीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या.
त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेला असतानाही त्या आटपाडी पंचायत समितीमध्ये आळे करून त्यांनी ठाण मांडले होते. त्यांच्या केबिनमध्ये विशिष्ट लोकांनाच प्रवेश दिला जात होता, अशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यांच्या बदलीचा कार्यकाल संपल्यानंतरही वर्षभर त्यांची बदली झाली नव्हती. फक्त बदली झाल्याच्या अफवा व वावड्या उडवल्या जात होत्या. त्यामुळे प्रशासनासह संपूर्ण कनिष्ठ व्यवस्थाही सुस्थ होती.
तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असताना दुष्काळग्रस्त लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी, मजुरांच्या हातांना कामे देण्यासाठी त्यांच्या प्रशासनामार्फत चालढकल होत असल्याचे आरोप होत होते. दुष्काळामध्ये त्यांनी लोकांची क्रूर चेष्टा केली असल्याचा आरोप अनेक निवेदनांमधून त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे केला गेला होता.
मात्र 28 फेब्रुवारी रोजी अचानक त्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढले असल्यामुळे पीडित लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांचे पाटण येथील रिक्त असलेल्या गटविकास अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शासनाने ही विनंती बदली असल्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्त/मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बदली झाल्याने त्यांच्या सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करून, त्यांच्या नियुक्तीच्या जागी तत्काळ रुजू होण्यास सांगावे असे आदेशही यामध्ये दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies