सांगलीत इनडोअर जिम्नॅस्टिक स्टेडिअमसाठी प्रयत्नशील- चोरमले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

सांगलीत इनडोअर जिम्नॅस्टिक स्टेडिअमसाठी प्रयत्नशील- चोरमले


सांगलीत इनडोअर जिम्नॅस्टिक स्टेडिअमसाठी प्रयत्नशील- चोरमले
राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 15 : सांगलीत इनडोअर जिम्नॅस्टिक स्टेडिअम करण्यासाठी, त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू. या स्टेडिअममध्ये खेळाडुंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पुण्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले यांनी काल येथे दिली. 
शांतीनिकेतन क्रीडांगणावर आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सांगली - मिरज - कुपवाड - महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत, ज्येष्ठ जिम्नॅस्टिकपटू शंकर आरासकर, राज्य जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान सांगली जिल्ह्याला मिळाला असून, या माध्यमातून राज्यस्तरीय चांगल्या खेळाडुंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळत आहे, असे स्पष्ट करून अनिल चोरमले म्हणाले, जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात आपले जास्तीत जास्त खेळाडु आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होतात. त्यामुळे या क्रीडा प्रकारासाठी दर्जेदार सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सूचना केल्याप्रमाणे सांगलीत दर्जेदार इनडोअर स्टेडिअम होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू. तसेच या स्पर्धेसाठी सीसीटीव्ही लावल्यामुळे स्पर्धेत पारदर्शकता आली आहे. कुठल्याही खेळाडुवर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट करून त्यांनी सहभागी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. 
सांगलीत जिम्नॅस्टिक्ससाठी चांगल्या दर्जाचे इनडोअर स्टेडिअम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून खेळाडु आले आहेत. त्यामुळे खेळाडुंनी दर्जेदार खेळ करावा. बक्षिसापेक्षा खिलाडु वृत्ती ठेवावी, असे ते म्हणाले. 
यावेळी महापौर संगीता खोत यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळणार असल्याचे सांगितले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली व नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने 14, 17, 19 वर्षे मुले/मुली या गटामध्ये होत असलेल्या या स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील 8 विभागातून 684 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 
प्रारंभी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडांगण पूजन करण्यात आले. श्रावणी मोहिते यांनी खेळाडुंना शपथ दिली. स्वागत गौतम पाटील यांनी केले. प्रास्ताविक माणिक वाघमारे यांनी केले. आभार प्रशांत पवार यांनी मानले.
यावेळी क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, शंकर भास्करे, एम. आलासे, प्रा. महावीर कुंभोजे, संजोग ढोले, सविता मराठे, मकरंद जोशी, संजीवनी पूर्णपात्रे, महेंद्र बाभूळकर, रामकृष्ण लोखंडे, योगेश शिर्के, सचिन मांडवकर, पूजा सुर्वे, वर्षा उपाध्ये, तनुजा गाढवे, विजय रोकडे, संजय तोरस्कर, दीपक सावंत, यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, खेळाडु, मान्यवर उपस्थित होते.
आर्टिस्टिक, रिदमिक व क्रोबॅटिक्स या उपप्रकारात स्पर्धा होत आहेत. आर्टिस्टिक व रिदमिक हे खेळप्रकार दि. 17 नोव्हेंबरपर्यंत तर क्रोबॅटिक्स हा खेळ दि. 18 व 19 नोव्हेंबर 2018 या कालावधीत होणार आहे. आर्टिस्टिक उपप्रकारात 168 मुले व 168 मुली असे एकूण 336 स्पर्धक सहभागी झाले आहेत. रिदमिक उपप्रकारात 96 मुले व 96 मुली असे एकूण 192 स्पर्धक सहभागी झाले आहेत. तर क्रोबॅटिक्स उपप्रकारात 84 मुले व 72 मुली असे एकूण 156 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेसाठी राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, क्रीडापीठ पुणे व यजमान कोल्हापूर अशा विभागातील विविध जिल्ह्यांतून 684 खेळाडु मुले/ मुली, 72 व्यवस्थापक, 100 पंच आणि 12 तांत्रिक लोक सहभागी झाले आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise