माळशिरस शौचालय अनुदानात घोटाळा प्रकरणी राहुल ढवणे अटकेत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

माळशिरस शौचालय अनुदानात घोटाळा प्रकरणी राहुल ढवणे अटकेत


माळशिरस शौचालय अनुदानात घोटाळा प्रकरणी राहुल ढवणे अटकेत
४१ लाख रुपयांचा केला होता अपहार, धनादेश लाभार्थींच्या खात्यावर भरलेच नाहीत.
माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस पंचायत समिती मध्ये ४१ लाख रुपयांचा शौचालय अनुदानात घोटाळा केल्या प्रकरणातील लिपिक राहूल ढवणे यास माळशिरस पोलिसांनी रांजणगाव (पुणे) येथून अटक केली असून तो गेले चार महिन्यापासून फरार होता.


माळशिरस पंचायत समिती मधील कनिष्ट सहाय्यक राहुल मारुती ढवणे याने शौचालय अनुदानाचा  ४१ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल माळशिरस पोलिसात  गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. परंतु  पोलिसांनी दोन पथके तयार करून व खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती वरून रांजणगाव जि. पुणे येथून त्याला काल ताब्यात घेत काल न्यायालयात हजार केले असता त्याला न्यायालयाने ६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल ढवणे माळशिरस पंचायत समिती कार्यालयात कनिष्ट सहाय्यक म्हणून कार्यरत होता. शौचालयाचे अनुदान लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याचे काम तो पाहत होता. त्याने मार्च २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत शौचालय अनुदानाचे ४१ लाख ६४ हजार रक्कमेचे धनादेश लाभार्थीच्या खात्यावर न भरता स्वत:च्या खातेवर जमा केले व ते करीत असताना त्याने स्वत:च्या बँक खाते नंबरचे बनावट शेडयुल्ड तयार करून सदर शेडयुल्ड वर गटविकास अधिकारी माळशिरस यांचा शिक्का मारून त्यावर बनावट सही करून बँकेत सादर करून गटविकास अधिकारी यांची दिशाभूल करून लाभार्थीची रक्कम स्वत:च्या बँक खात्यावरती जमा करून घेतली. याबाबत तत्कालीन गटविकास अधिकारी सुरेश मारकड यांनी माळशिरस पोलिसात तक्रार  दाखल केली होती.
या शौचालय घोटाळा प्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी चौकशी करून तत्कालीन गटविकास अधिकारी सुरेश मारकड यांना निलंबित केले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस लिपिक राहुल ढवणे च्या शोधात होते. परंतु तो सापडत नव्हता. त्याच्या भ्रमणध्वनीचे लोकेशन सातत्याने बदलत असल्याने त्याला पकडणे शक्य होत नव्हते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, उपाधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके त्याच्या तपासासाठी करण्यात आली होती. या पथकांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती वरून व त्याने स्वत:चा भ्रमणध्वनी सुरु केल्यामुळे त्याचे ठिकाण पोलिसांना समजले. त्यावरून पोलिसांनी त्यास रांजणगाव पुणे येथे ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेतल्याने या प्रकरणात अजून कोण-कोण सामील आहे हे समजणार आहे. पोलीस निरिक्षक विश्वबर गोलंडे, फौजदार प्रमोद सुर्वे, सुयोग वायकर, पोलीस हवालदार समीर पठाण, विक्रम घाडगे, अमोल बकाल, राहुल रूपनवर, सचिन हेंबाडे, समाधान शेंडगे यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment

Advertise