सांगलीत बुधवारपासून राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

सांगलीत बुधवारपासून राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धा


सांगलीत बुधवारपासून राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धा
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 12 : राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान सांगली जिल्ह्याला मिळाला असून, दि. 14 ते 19 नोव्हेंबर 2018 या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील 8 विभागातून 684 स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी आज येथे दिली. यावेळी क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, शांतिनिकेतन विद्यापीठाचे अध्यक्ष गौतम पाटील आदि उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा होणार आहेत. 14, 17, 19 वर्षे मुले/मुली या गटामध्ये शांतीनिकेतन लोकविद्यापीठ, माधवनगर रोड, सांगली येथे या स्पर्धा होणार आहेत. 
आर्टिस्टिक, रिदमिक व ॲक्रोबॅटिक्स या उपप्रकारात स्पर्धा होणार आहेत. आर्टिस्टिक व रिदमिक हे खेळप्रकार दि. 15 ते 17 नोव्हेंबर तर ॲक्रोबॅटिक्स हा खेळ दि. 18 व 19 नोव्हेंबर 2018 या  कालावधीत होणार आहे. आर्टिस्टिक उपप्रकारात 168 मुले व 168 मुली असे एकूण 336 स्पर्धक सहभागी होणार आहेत. रिदमिक उपप्रकारात 96 मुले व 96 मुली असे एकूण 192 स्पर्धक सहभागी होणार आहेत. तर ॲक्रोबॅटिक्स उपप्रकारात 84 मुले व 72 मुली असे एकूण 156 स्पर्धक सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, क्रीडापीठ पुणे व यजमान कोल्हापूर अशा विभागातील विविध जिल्ह्यांतून 684 खेळाडु मुले/ मुली, 72 व्यवस्थापक, 100 पंच आणि 12 तांत्रिक लोक सहभागी होणार आहेत. शांतीनिकेतन लोकविद्यापीठामध्ये विद्युत झोतातील सुसज्ज मंडपामध्ये या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सहभागी खेळाडू, पंच, अधिकारी यांच्या निवासाकरिता शांतीनिकेतन लोकविद्यापीठातील मुला/मुलींचे वसतिगृह वापरण्यात येणार आहे. सहभागी खेळाडुंसाठी भोजन व्यवस्था देखील स्पर्धेच्या ठिकाणीच करण्यात येणार आहे. 
स्पर्धेचे उदघाटन दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार अनिलराव बाबर यांच्याहस्ते सकाळी 11.00 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष वि. ना. काळम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या  राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक स्पर्धेमधून दिनांक 16 ते 20 डिसेंबर 2018 अखेर त्रिपुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या मुला-मुलींची निवड होणार आहे.


No comments:

Post a Comment

Advertise