पलूस व कडेगाव तालुका दुष्काळ करा- आम. विश्वजित कदम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

पलूस व कडेगाव तालुका दुष्काळ करा- आम. विश्वजित कदम


पलूस व कडेगाव तालुका दुष्काळ करा- आम. विश्वजित कदम 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
कडेगाव/प्रतिनिधी : कडेगाव येथे संपूर्ण पलूस व कडेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा यासह अन्य मागणीसाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या दुटप्पी धोरनाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी आ.मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, महेंद्र लाड, युवा नेते डॉ.जितेश कदम, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भिमराव मोहिते उपस्थित होते. 
यावेळी बोलताना आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, शासनाने केवळ राजकारणास्तव चुकीचे निकष लावून कडेगाव व पलूस तालुके दुष्काळ यादीतून वगळले आहे. परंतु हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यासाठी होणाऱ्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार आहे. शासनाने चुकीचे निकष लावून केवळ राजकारणापोटी कडेगाव व पलूस हे दोन्ही तालुके दुष्काग्रस्त यादीतून डावलले आहे. दुष्काळ प्रश्नी सरकार दुजाभाव करत आहे असा आरोप आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी केला.
पलूस -कडेगाव या दोन्ही तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. खरीप हंगामातील पिके वाया गेली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. तालुक्यातील ५० टक्केहून अधिक शेतजमीन कोरडवाहू आहे. सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील शेजारचे तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट केले आहेत. त्यांना न्याय दिला याबाबत आमचे दुमत नाही परंतु आमच्यावर अन्याय का? याचे शासनाने उत्तर दिले पाहिजे.आघाडी सरकारच्या काळात अनेक ठिकाणी पक्षपात न पाहता दुष्काळ जाहीर करण्यात आले. परंतु भाजप सरकार दुजाभाव करीत पक्षपातीपणा करीत आहे. आघाडी शासनाच्या काळात स्व.आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी राज्यात कुठेही कधीही  दुष्काळ नाकारला नाही. तसेच दुष्काळग्रस्तांना मदतही नाकारली नाही. परंतु आजचे शासन दुष्काळ नाकारून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणांमुळे पलूस व कडेगाव तालुक्यावर आस्मानी संकटा बरोबरच सुलतानी संकट कोसळले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पलूस व कडेगाव तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. 
सकाळी ११ वाजता कडेगाव येथील मोहरम चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्व आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी केले. पलूस व कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी  मोर्चात सहभागी झाले होते. 
मोर्चाच्या मार्गावर पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली  कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी  बाराच्या सुमारास मोर्चा प्रांत कार्यालयासमोर दाखल झाला. यावेळी शिवाजीराव पवार, बाळकृष्ण यादव, भीमराव मोहिते, मालन मोहिते, डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांची शासनाविरोधात आक्रमक  भाषणे  झाली. यावेळी जयसिंगराव कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, पलूस तालुकाध्यक्ष ऐ. डी. पाटील, सुरेश निर्मळ, कडेगाव नगरपंचायतिचे उपनगराध्यक्ष साजिद पाटील, विजय शिंदे, समाधान घाडगे, सुनील पाटील, महेश कदम, नगरसेवक दिनकर जाधव, सागर सूर्यवंशी, सुनील पवार, राहुल पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Advertise