Type Here to Get Search Results !

मोजक्याच पुजारी, मानकरी, सेवेकरी यांच्या उपस्थितीत म्हसवडच्या सिध्दनाथ-जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा संपन्न : चोख पोलीस बंदोबस्त



मोजक्याच पुजारी, मानकरी, सेवेकरी यांच्या उपस्थितीत म्हसवडच्या सिध्दनाथ-जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा संपन्न : चोख पोलीस बंदोबस्त

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ-जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री 12 वाजता धार्मिक विधीपूर्वक ,पारंपारिक पध्दतीने मोजक्याच पुजारी,मानकरी, सेवेकरी यांच्या उपस्तीतीत थाटात संपन्न झाला.




तब्बल महिनाभर चालणाऱ्या श्रींच्या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते आरती करुन मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे 12 दिवसाचे घट उठविण्यात आले. घट उठविल्यानंतर 12 दिवसाच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले.






या विवाहसोहळ्यासाठी  श्री सिध्दनाथ हत्तीवरून गेले होते, अशी अख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती आहे. या हत्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसविण्यात आली. संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसविण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी "वर" सज्ज झाला.


रंगीत कागदाच्या पताका, फुलांच्या माळा, ऊसाच्या मोळ्या, भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजविण्यात आला होता. श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात आणण्यात आले .रात्री साडेअकराच्या सुमारास हत्ती मंडपात आणण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तीवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती दरवर्षी  सालकऱ्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात नेण्यात येते.  बाहेरील हत्ती मंडपातून आतील गभाऱ्यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविक श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत असतात आणि सालकऱ्यांसह श्रींची मूर्ती आतील गाभाऱ्यात विवाहाप्रित्यर्थ नेण्यासाठी पुजारी मंडळी,पुढे जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत असतात. ही रणधुमाळी सुमारे अर्धा तास सुरु असते शेवटी मोठी रस्सीखेच होऊन श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेण्यात येते. मात्र चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार मोजक्याच पुजारी, मानकरी, सेवेकरी यांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात सालकरी अविनाश गुरव यांनी श्रींची मूर्ती दोन्ही हातात घेऊन शांतपणे सहज चालत गाभाऱ्यात नेली व त्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरुन पारंपारिक पध्दतीने,विधीपूर्वक पिंटू पाठक या पुरोहितांमार्फत मंगलाष्टका म्हणून श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री 12 वाजता सनई-चौघडा, ढोल यांच्या जल्लोषात, मोठ्या थाटात संपन्न झाला. 


पारंपारिक रिवाजानुसार श्रींच्या विवाहसोहळ्यानंतर मंदिरातील तुळसी विवाह तसेच पुजारी मंडळीच्या घरातील तुळसी विवाह संपन्न झाले.


श्रींच्या विवाहानंतरची "वरात"म्हणजे श्रींची "रथयात्रा" ही रथयात्रा मंगळवार दि. 15 डिसेंबर रोजी असून या दिवशी तब्बल एक महिना चालणाऱ्या श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे.  या रथयात्रेसाठी दरवर्षी 6 ते 7 लाख भाविक आवर्जून उपस्थित असतात. मात्र ,चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कोरोना बाधित संख्या आटोक्यात यावी म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याने शिवाय कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने  शासन जो निर्णय घेईल त्यानुसार  यात्रा भरणार की नाही हे ठरविले जाणार आहे.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies