आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही... रोहित पवार यांचे गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 10, 2020

आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही... रोहित पवार यांचे गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरआपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही... रोहित पवार यांची गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : शरद पवार यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्र सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या खांद्यावरून खाली उतरून त्यांच्या मतदार संघात येवून विकास कामे करावीत असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांना देत त्यांच्यावर टिका केली होती. त्यांच्या या टीकेला सुद्धा आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून तोडीस तोड उत्तर दिले असून त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे.


काय आहे आमदार रोहीत पवार यांची फेसबुक पोस्ट  

माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते. असो.

पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत.

आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय... ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका.

राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा.... तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा.

मित्र म्हणून आपल्याला शुभेच्छा.....Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise