दहिवडी आगाराकडून म्हसवड बसस्थानाकाला नेहमीच सापत्नपणांची वागणूक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

दहिवडी आगाराकडून म्हसवड बसस्थानाकाला नेहमीच सापत्नपणांची वागणूकदहिवडी आगाराकडून म्हसवड बसस्थानाकाला नेहमीच सापत्नपणांची वागणूक

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/प्रतिनिधी : राज्यातील एस टी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. मात्र दहिवडी आगार व सातारा विभागीय कार्यालय यांनी म्हसवड बसस्थानाकाकडे पूर्ण क्षमतेने दुर्लक्ष केल्याने बसस्थानाकाची दयनीय अवस्था झाली झाली असून प्रवाशांची गैरसोय होत आहे.  


ग्रामीण प्रवाशाची लाडकी लालपरी लॉकडाऊन नंतर पूर्ण क्षमतेने सुरू केली आहे. मात्र दहिवडी आगार व विभागीय कार्यालय यांनी म्हसवड बसस्थानाकाबाबत गांधारीची भूमिका घेतली आहे की काय? असा प्रश्न म्हसवड बसस्थानाकाकडे पाहिल्यानंतर पडतो. दहिवडी आगाराच्या कार्यक्षेत्रात म्हसवड बसस्थानक येते. माण तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे व मोठी बाजारपेठ असणारे म्हसवड हे शहर आहे. शिवाय दहिवडी आगाराला जास्त उत्पन्न मिळवून देणारे हे शहर आहे. मात्र दहिवडी आगाराकडून म्हसवड बसस्थानाकाला नेहमीच सापत्नपणांची वागणूक देत आली आहे.


महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने बस वाहतूक सुरू केली आहे. मात्र दहिवडी आगाराने एकही बस सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणाहून तसेच दहिवडी या तालुक्याच्या ठिकाणावरून म्हसवडला सुरू केली नाही. म्हसवड बसस्थानकात असणारे वाहतूक नियंत्रण कक्ष बंद ठेवला आहे. त्यामुळे कोणतीही माहिती मिळू शकत नाही. म्हसवड शहराचे नशिब म्हणून या शहारातून सातारा-सोलापूर हा राज्यमार्ग गेला आहे. त्यामुळे सातारा-सोलापूर या बसेस म्हसवडहुन जातात, अन्यथा म्हसवडकरांना लालपरीचे दर्शनही दुर्लभ झाले असते.  


दहिवडी आगार व विभागीय नियंत्रण यांच्या या कारभाराचा फटका पोस्टला व पर्यायाने म्हसवडकरांना बसत आहे. सातारा ते म्हसवड अशी एकही बस नसल्याने सातारा पोस्ट ऑफिसमधील मेल विभाग म्हसवडचे टपाल व पार्सल सातारा-दहिवडी गाडीने दहिवाडीला पाठवतात. सातारा-म्हसवड अशी गाडी नसल्याने सर्व टपाल व पार्सल दहिवाडीला पाठविले जाते. वास्तविक सातारा-सोलापूर या म्हसवड मार्गे जाणाऱ्या गाड्या असतानाही या गाडीत टपाल टाकले जात नाही त्यामुळे म्हसवड पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी यांना हे टपाल व पार्सल स्वतः दहिवाडीला जाऊन आणावे लागते. दहिवडीहून म्हसवडला एस.टी. बस नसल्याने कधी या कर्मचाऱ्याना स्वता:च्या दुचाकीवरून तर कधी भाडोत्री रिक्षा करून दहिवाडीवरून हे टपाल व पार्सल स्वता:च्या खर्चाने आणावे लागत आहे. दुचाकीवरून सर्व पार्सल एकावेळी आणणे शक्य होत नाही. त्यामुळे दहिवाडीवरून तीन ते चार दिवसांनी पार्सल म्हसवडला येते. याचा फटका लोकांना बसत आहे. महत्वाचे पत्र किंवा पार्सल वेळेत न मिळाल्यामुळे नुकसान आणि गैरसोय होत आहे.


दहिवडीवरून एस.टी. बस सुरू करण्यासंदर्भात दहिवडी आगार व्यवस्थापक यांना मोबाईलवरन संपर्क साधला असता आगारव्यवस्थापक फोन उचलण्याची तसदी घेत नाहीत. त्यांना प्रवाशांचे कसलेही देणे नसावे असे वाटते. म्हसवड बसस्थानकात 9 बसेस मुक्कामी असतात. आता एकही येत नाही,चौकशी करता मुक्कामी बसेसच्या चालक आणि वाहक यांची मुक्कामाची कसलीही सोय होत नसल्याने त्या आगारांनी मुक्कामी बसेस बंद केल्या आहेत. एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व पोस्टाच्या अधिकारी यांनी याची दखल घेऊन सुधारणा न केल्यास ग्राहक संघटना तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise