10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागले : एकनाथ खडसे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 2, 2020

10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागले : एकनाथ खडसे10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागले : एकनाथ खडसे


जळगाव : दहा पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केला.  


68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता पुन्हा एकदा संताप व्यक्त केला.’राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार असल्याचं म्हणत खडसे यांनी टोला लगावला.


खडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी मोठी मेहनत घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असं खडसे म्हणाले.


मी गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. राज्यातील अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलो, त्या पक्षाला सोडून जावं असा कधीही मनात विचार आला नसल्याचं खडसे म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise