Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान



महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली : अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक  पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२०’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर शास्त्रीभवन स्थित शिक्षण मंत्रालयातून केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते.


देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी ४७ शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणीमध्ये गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.


अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी (चेडगांव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलाराम यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत श्री. मंगलाराम हे नवनवीन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी ई-लर्निंग पद्धतीचा अवलंब केला असून शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल केला आहे. श्री. मंगलाराम यांनी सुरु केलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरूम’च्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थी हे परदेशातील शिक्षकतज्ज्ञांशी संवाद साधतात. ‘स्काइप इन क्लासरूम’ या उपक्रमाद्वारे या शाळेतील विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक देवाण-घेवाण केली आहे. त्यांनी दक्षिण कोरिया मधल्या शाळेबरोबर ‘कल्चरल बॉक्स’ हा सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा उपक्रम राबविला आहे.


विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन तसेच शालेय स्तरावरील ‘बालआनंद मेळावा’, ‘बालसृष्टी उपक्रम’, ‘डॉ अब्दुल कलाम तरंग वाचनालय’ आदी  त्यांचे उल्लेखनीय उपक्रम आहेत. स्थानिक ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांनी जागरूकता घडवली व या कार्यात त्यांचेही सहकार्य मिळविले आहे.


मुंबई येथील अणुशक्तीनगर भागातील भाभा अणुशक्ती केंद्रीय शाळा क्रमांक ४ च्या शिक्षिका संगीता सोहनी यांना उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. हसत खेळत विज्ञान शिकवण्याची कला त्यांनी विकसित केली आहे. आयसीटी शिक्षण पद्धतीचा प्रभावी उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणअधिक सोपे केले. काचेच्या बांगड्यांद्वारे केमिकल बाँडींग आणि फुग्यांचा उपयोग करून रसायन शास्त्रातील बारीकसारीक घटक शिकवण्याच्या त्यांच्या कलेचे विशेष कौतुक झाले. विद्यार्थ्यांना अध्ययन अधिक सुगम होण्यासाठी त्या आपल्या सहकारी शिक्षक शिक्षिकांनाही प्रशिक्षण देतात.


  Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies