Type Here to Get Search Results !

संपादकीय : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे राजकारण....!!


संपादकीय : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे राजकारण....!!


अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा मुहूर्त जसा-जसा जवळ येत चालला आहे, तस-तसे देशातील राजकीय वातावरण गरम होऊ लागलेले आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी मोदी सरकारने काही मोजक्याच लोकांना व पक्षांना निमंत्रित केलेले आहे. 


त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांना राममंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. भाजप सरकारने राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम म्हणजे स्वतःचा वैयक्तिक व घरगुती कार्यक्रम आहे, असाच आव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री, जितेंद्र आव्हाड यांनी, श्रीराम कोणाच्या सात-बारा उताऱ्यावर नाही, तो सातबारा उतारा कोणाच्या ही मालकीचा नाही. त्यामुळे भाजप सरकार रामाच्या नावाने राजकीय सत्तेची भिक मागत आहे. त्यांना या गोष्टीची ही जाणीव नाही की राजकारणाचा भाग वेगळा असतो आणि श्रद्धा व भक्ती वेगळी असते. 


अयोध्येतील राम मंदिर व राम जन्मभूमीवर अधिकार सांगण्याचा ठेका फक्त भारतीय जनता पक्षानेच घेतलेला आहे का..?  हा प्रश्नही निर्माण होत आहे.  त्याचबरोबर कोरोना सारख्या विषाणूच्या विळख्यात संपूर्ण देश सापडलेला असताना भाजप मात्र राम मंदिर भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे. भाजप सरकारने आयोजित केलेला राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा व त्यावरील त्यांची मक्तेदारी, हा संकुचित राजकारणाचा भाग आहे. 


गेले चाळीस वर्ष भाजप रामाच्या नावावर राजकारण करत आहे. रामाचं नाव घेऊन भाजपवाल्यांनी पाणी विकलं आहे, विटा विकल्या आहेत, सत्ता मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते भाजपवाल्यांनी रामाच्या आणि धर्माच्या नावावर केलेलं आहे. ज्या रामाच्या व हिंदुत्वाच्या नावावर भाजपने केवळ राजकारण केलं आहे. मात्र त्यांनी या देशात आदर्श रामराज्य प्रस्थापित करण्याचा व देशातील बहुसंख्य हिंदू म्हणून जीवन जगत असणाऱ्या बहुजन समाजाच्या समस्याकडे मात्र अजिबात लक्ष दिलेलं नाही. केवळ राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी राम व हिंदुत्व यांचा वापर केला आहे. परंतु या देशातील जनता दुधखुळी नाही त्यांनी हे ओळखलेलं आहे की राम आणि हिंदुत्व यांच्या पाठीमागे तीन टक्क्यांचा स्वार्थ दडलेला आहे.


संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या भीतीने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये कोरोणाचा भयानक आजार, सर्वसामान्य लोकांच्या अन्नाचा प्रश्न, रोजंदारी व बेकारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीचा प्रश्न, सर्व उद्योग, धंदे, व्यवसाय ठप्प आहेत. वस्तू उत्पादनाच्या सर्व कंपन्या, कारखाने व इंडस्ट्रीज ठप्प आहेत. असे अनंत गंभीर प्रश्न जनतेच्या जीवावर बेतलेले असताना, देश संभाळण्याची व चालवण्याची जबाबदारी घेतलेल्या भाजप सरकार मात्र, राम मंदिर भूमिपूजन सोहळा साजरा करण्यामध्ये मग्न आहे. देशातील सर्व देवतांचे मोठ-मोठे सोहळे, महापुरुषांच्या जयंत्या, जत्रा, यात्रा, बाजार, पंढरीची वारी मुस्लिम धर्मीयांचे सण या सर्वांच्यावर कोरोनामुळे बंदी घालण्यात आलेली असताना, हिंदू धर्माचा ठेका स्वतःच घेतल्याप्रमाणे अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा भाजपच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे. खरेतर जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाने संविधानाचा, लोकशाहीचा व समान न्यायाचा केलेला अपमान आहे. जाणीवपूर्वक भाजप सरकार समाजात विषम न्याय व्यवस्था रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे.


ज्यावेळेस कार सेवकांनी बाबरी मशीद पाडली होती, त्यावेळेस भाजपच्या कारसेवकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती, त्यावेळी त्यांनी,' तो मी नव्हेच...!' अशी भूमिका घेतलेली होती. मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेच्या कार सेवकांनी बाबरी मशीद पाडली असेल, तर त्यांचे मी कौतुकच करतो, अशी भूमिका जाहीर भाषणातून व्यक्त केलेली  होती. तसेच विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर बांधकामासाठी एक कोटी रुपये दान दिलेले आहेत. 


तरी ही त्यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल म्हणतात की,' अटलबिहारी वाजपेयी त्यावेळेस भाजपचे प्रमुख होते. त्यांनी राम मंदिराच्या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण केलेल्या होत्या. खरा राम मंदिराचा अजेंडा पुढे रेटण्यात माजी पंतप्रधान राजीव गांधीं, नरसिंहराव व अशोक सिंघल यांचे खरे योगदान आहे.' मात्र भाजपचे नेते हे दुसऱ्याची डाळ स्वतःच्या पोटावरती ओढून घेत आहेत. खऱ्या अर्थाने सन 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष राम मंदिराचा उपयोग करीत आहे. राम मंदिराच्या नावावर राजकारण केल्याशिवाय भाजपला कोणतेही गत्यंतर नसल्याने अयोध्येतील राम भाजपवाले दुसऱ्यांच्या वाटणीला येऊ देत नाही. 


खरेतर या देशात बहुसंख्य हिंदूधर्मीय आहेत, त्या सगळ्यांचा अयोध्येतील राम मंदिरावर अधिकार असताना भाजपवाले मात्र या अयोध्येतील रामाची भक्ती करण्यासाठी इतर हिंदू धर्मियांना सहभागी करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. कारण त्यांना आपल्या भविष्याची काळजी वाटते आहे. जर अयोध्येतील राम मंदिरावर देशातील इतर राजकीय पक्षाच्या लोकांनी आपला हक्क सांगितला तर, भाजपला पळता भुई थोडी होईल. म्हणून ते केंद्रातील सत्तेच्या जोरावर अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम स्वतःचा व स्वतःच्या मालकीचा असल्याचा आव आणून भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहेत. सुज्ञ भारतीय जनता त्यांच्या या कावेबाज राजकारणाला चांगली ओळखून आहे, यात मुळीच शंका नाही.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies