Type Here to Get Search Results !

संपादकीय : भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांचा कोरोनावर जालीम उपाय....!!


संपादकीय :  भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांचा कोरोनावर जालीम उपाय....!!



भाजपच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सर्व भारतीयांना कोरोनचे संकट संपवण्यासाठी ' हनुमान चालीसा' या पुस्तकाचे पठण करण्याचा जालीम उपाय सुचवला आहे. 


संशोधक प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा असा सल्ला आहे की, ' 25 जुलै  ते 5 ऑगस्ट या कालावधीत सर्वांनी दररोज सायंकाळी सात वाजता ' हनुमान चालीसा ' या पुस्तकाचे पाच वेळा वाचन करावे.  त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रामललाची आरती करून, घरामध्ये दिवा लावावा व 'हनुमान चालीसा पठण' कार्यक्रमाची समाप्ती करावी. कोरोणाच्या संकटापासून सर्व भारतीयांना सोडवण्यासाठी आपण सगळेजण मिळून एक अध्यात्मिक प्रयत्न करू या असे आव्हान ही त्यांनी केले आहे. यापूर्वी भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवायला लावल्या होत्या; थाळीनाद करायला लावला होता; दिवे लावायला सांगितले होते; एवढे सगळे करून ही कोरोना घाबरून एक पाऊल ही मागे सरकला नव्हता. उलट त्याने आपले अकरा-विक्राळ रूप दाखवायला सुरुवात केली होती. खरे तर कोरोनाला घाबरून आपल्या देशातील 33 कोटी देवांनी आपल्या भक्तांचे रक्षण करण्या ऐवजी आपल्या देवळाचे दारे बंद करून घेऊन आत बसले होते म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने वरील उपाय सुचवलेले असावेत. 



पण त्यांच्या या उपायाचा काही ही उपयोग न झाल्यामुळे पुन्हा त्यांचेच शिष्य असलेल्या प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी अतिशय प्रयत्नातून हा शोध लावलेला दिसतोय. खरे तर 'हनुमान चालीसा' ही रामभक्त कवी तुळशीदास यांची साहित्य रचना आहे. त्या पुस्तकामध्ये कवी तुलसीदास यांनी स्वतःला दीन, हिन, नीच, गरीब, दास व गुलाम समजून आपल्या दुःखाचे निवारण प्रभू रामचंद्रांनी करावे, म्हणून प्रभू रामचंद्राचा विश्वासू सेवक हनुमानजी यांच्यामार्फत आपली व्यथा प्रभू रामचंद्र पर्यंत पोहोच करण्याची विनंती केलेली आहे. ही व्यथा तुलसीदासांनी चाळीस छंदात मांडली आहे, म्हणून या पुस्तकाला 'हनुमान चालीसा'  नाव दिले गेले आहे. हे पुस्तक एक साहित्य रचना आहे. मात्र प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी या पुस्तकाचे वाचन केल्यामुळे कोरोनाच्या संकटातून आपण मुक्त होऊ शकतो, हा केलेला दावा म्हणजे आपला बालिशपणा व वेढेपणा जगाच्या समोर मांडल्या सारखे आहे. जेव्हा प्रज्ञा सिंग ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोटांमध्ये आरोपी म्हणून सापडल्या होत्या तेव्हा त्यांनी आपण केलेल्या वाईट कृत्यातून सहिसलामत बाहेर पडावे म्हणून 'हनुमान चालीसा' या ग्रंथाचे वाचन केलेले असावे, कदाचित त्यामुळेच त्या एवढा मोठा गुन्हा करून ही सहीसलामत तुरुंगातून बाहेर निघालेल्या आहेत. 



सांगलीच्या हनुमान भक्ताने आपल्या शेतातील आंब्याचे आंबे खाल्ल्यानंतर निपुत्री महिलांना मुले होतात अशी अजब घोषणा काही दिवसापूर्वी केलेली होती तर दुसऱ्या एका महाराजाने सम तारखेला पती-पत्नी प्रेम केले तर मुलगा जन्माला येतो व विषम तारखेला प्रेम केले तर रांगडी औलाद जन्माला येते असा अजब शोध लावलेला होता. म्हणजे हे सगळे विद्वान व संशोधक नेमकं या देशाला व देशातल्या जनतेला कुठे चंद्रावर घेऊन चाललेत की खड्ड्यात गाडायला चाललेत हेच कळायला मार्ग नाही. सन 2014 मध्ये पूर्वीच्या सरकारला कंटाळलेल्या जनतेने सत्ता बदल हवा म्हणून या भाजपच्या हातात सत्तेची चावी दिली त्यामुळे त्यांनी याचा विचार उपयोग देशामध्ये मानवतेचा विकास करण्यासाठी करायला हवा होता. 



पण तसे न करता त्यांनी ज्या देव, धर्म, जाती, अंधश्रद्धेमुळे, पोती-पुराण, मंत्र-तंत्र, जादू-टोना यांच्यामुळे देश अविकसित राहिला होता, त्या काल्पनिक गोष्टींचे दरवाजे खुले केले. महाराज व बुवांना देवाचा व धर्मांचा प्रचार-प्रसार करण्यास परवानगी दिली. लोकांचे वास्तववाद, मानवतावाद व विज्ञानवादी गोष्टी कडचे लक्ष विचलित करून देव, धर्म आणि अंधश्रद्धा याकडे यांचे लक्ष वळवले. कोरोना पासून माणसाला वाचवण्यासाठी जगातील प्रत्येक देश औषध शोधण्यासाठी संशोधन करीत आहे, तरीही त्या देशातील संशोधकांना कोरोनाच्या संदर्भात लस उपलब्ध करून देण्यात यश आलेलं नाही. प्रज्ञा सिंग ठाकूर जेलमध्ये असताना त्यांच्या स्वप्नात कोरोना आलेला असावा व त्यावेळी त्यावर चिंतन-मनन व अभ्यास करून हा उपाय शोधून काढलेला असावा. खरेतर एवढं मोठं संशोधन करणाऱ्या साध्वी, प्रज्ञासिंग ठाकूर यांना 'हिंदुस्थान रत्न' हा पुरस्कार देण्यात आला पाहिजे. 



कदाचित प्रज्ञासिंग ठाकूर यांनी 'हनुमान चालीसा' या पुस्तकाच्या विक्रीची एजन्सी घेतलेली असावी. त्यामुळेच त्या हे पुस्तक कोरोनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या भारतीयांच्या माथ्यावर मारून धनदौलत गोळा करण्याचा त्यांचा डाव असावा. प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या या मौल्यवान कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, व जागतिक आरोग्य संघटनेकडे त्यांना पुरस्कार देण्याविषयी शिफारस करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies