संपादकीय : देवेंद्र फडणवीस यांना खरंच सरकार पाडण्यात रस नाही - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 19, 2020

संपादकीय : देवेंद्र फडणवीस यांना खरंच सरकार पाडण्यात रस नाही


संपादकीय : देवेंद्र फडणवीस यांना खरंच सरकार पाडण्यात रस नाही
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेतीविषयी विविध प्रश्न आणि साखर उद्योगासमोर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा यांची भेट घेतली. शेतकऱ्याना एफआरपी मिळाला पाहिजे आणि साखर कारखाने ही व्यवस्थित चालले पाहिजेत, या संदर्भातील अडचणीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा यांच्या सोबत चर्चा केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या संदर्भात माहिती गृहमंत्र्यांना दिली. या भेटीच्या पाठीमागे कोणता ही राजकीय अजेंडा नव्हता, तसेच महाराष्ट्र राज्यातील सरकार पाडण्यात रस नाही, असे ही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून दिल्लीकडे रवाना झाल्याची  बातमी महाराष्ट्रातील जनतेला समजली व त्यावर अनेक प्रकारे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेला खात्रीने माहित आहे की, देवेंद्र फडणवीस सहजासहजी दिल्लीला जात नाहीत. दिल्लीला जाण्यापाठीमागे त्यांचा काही तरी हेतू निश्चित असतो, हे आता महाराष्ट्राला कळून चुकले आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये महाजॉब पोर्टलच्या जाहिराती वरील फोटोवरून राजकारण सुरू आहे. महाजॉब पोर्टलच्या जाहिरातीवर फक्त शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे फोटो असल्यामुळे काँग्रेसचे मंत्री नाराज  आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा रंगण्यास मदत झालेली आहे. या चर्चेच्या संदर्भातच आपले स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे.
   देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या संदर्भात आणि त्यांनी  अमित शाहा यांच्या सोबत केलेल्या चर्चे संदर्भात वरील प्रमाणे स्पष्टीकरण केलेलं असलं, तरी या स्पष्टीकरणामध्ये तथ्य असल्याचं जाणवत नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून ते आज पर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात रस घेतला नाही, असे चुकून झालेले नाही. कारण महाविकास आघाडी सत्तेत येण्याच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी अनंत धडपडी केलेल्या आहेत. यासाठी त्यांना राष्ट्रपती, केंद्र सरकार, न्यायालय व महाराष्ट्रातील राज्यपाल यांनी कायदेशीर व बेकायदेशीर दोन्ही बाजूंनी भरपूर सहकार्य केलेले होते. त्यांनी मुख्यमंत्री होण्याच्या उत्कंठा अभिलाशे पोटी पहाटे सात वाजता महाराष्ट्रातील जनता झोपेत असतानाच मुख्यमंत्री पदाचा शपथ-विधीचा कार्यक्रम आटोपला होता. हे महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या इतिहासातील एक अजब घटना होती. त्यानंतर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांच्या विधान परिषद किंवा विधानसभा सदस्यत्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक बाहेर काढला होता. अशा अनेक घटना आहेत, की त्यामध्ये त्यांनी रस घेऊन आपली मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आहेत. एवढंच नाही तर, अगदी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी रस  घेऊन-घेऊन त्याचा चोथा झाला तरी ते थांबणार नाहीत. कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला असे अभिवचन दिलेले आहे की,'' मीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहे." ते फार जिद्दी आहेत. अगदी चालू विधानसभेची मुदत संपेपर्यंत ते पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करणारच आहेत. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. यासाठी त्यांनी कोरोनाच्या समस्येत महाराष्ट्र अडकलेला असताना सुद्धा राज्य सरकारला मदत करण्याऐवजी त्यांच्या कार्यात अडचणी निर्माण करण्याचा त्यानी प्रयत्न केले होते. त्यानी कोरोना आपत्तीच्या वेळी सरकारला केलेली आर्थिक मदत सुद्धा केंद्र सरकारच्या खात्यात जमा केली. ते विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे प्रत्येक चांगल्या व वाईट प्रसंगाच्या वेळी ते आपला विरोध करण्याचा धर्म नियमितपणे पाळत असतात आणि पाळत राहणार आहेत, यात अजिबात शंका नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा व इतर नेत्यांची घेतलेली भेट राजकीय भेट होती किंवा महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस असणारी भेट होती... या शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेले स्पष्टीकरण ही वरवरची पॉलिसी आहे, असेच म्हणावे लागेल. 

No comments:

Post a Comment

Advertise