Type Here to Get Search Results !

संपादकीय : आम.पडळकर साहेब, जरा सबुरीने घ्या.......!


संपादकीय : आम.पडळकर साहेब, जरा सबुरीने घ्या.......!
 धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवार केवळ राजकारण करत असल्याचा आणि आज पर्यंत बहुजन समाजावर शरद पवारांनी अत्याचार केलेले आहेत, त्यामुळे असे समाजावर अत्याचार करणारे नेतृत्व हे राज्याचे नेतृत्व असू शकत नाही, ते महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असा थेट आरोप भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या वरती करून राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. 
खरे तर धनगर समाज आरक्षणाच्या व बहुजन वंचित समाजाच्या जीवावर आमदार झालेल्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या सारख्या एका ज्येष्ठ राजकारणी व्यक्तीवर हे आरोप करण्यापूर्वी ते आरोप स्वतःवर करून थोडं आत्मचिंतन करावं, कारण धनगर समाजाच्या आरक्षणाचं खरं राजकारण करून व बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून लोकसभेला बहुजनांची भरगच्च मते मिळवून भाजपला पांढरे डोळे करायला लावणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आरोपला आपण स्वतः पात्र आहोत की नाही, याची खात्री करावी. पडळकर साहेब, आपण राजकारणामध्ये अजून नवीन आहात, जरा सबुरीने घ्या, नाही तर चटके बसतील. कारण तुम्ही  जे आरोप शरद पवारांच्या वरती केलेले आहेत, ते आरोप म्हणजे दुधारी हत्याराप्रमाणे आहेत. हे हत्यार तुम्ही जरी शरद पवार यांच्यावर उगारले असले तरी ही त्यांच्याकडे असणारी धार मुंड आहे, मात्र तुमच्याकडे असणारी धार करी करकरीत आहे. त्यामुळे या हत्याराचा वार शरद पवार यांच्यावर होण्याऐवजी उलटा तुमच्यावरती होऊ शकतो. खरेतर तुम्हीच धनगर आरक्षणाचा खेळखंडोबा करत आमदार झालेला आहात. त्यामुळे अगोदर धनगर समाजाला एसटी कॅटेगरीचे आरक्षण मिळवून देण्यासाठी धडपड करा. नुसती धडपडतच नाही तर धनगर समाजाचा समावेश एसटी कॅटेगिरी मध्ये झालाच पाहिजे. तरच भविष्यात तुमच्या अस्तित्वाला व आमदारकीला किंमत आहे. अन्यथा तुमच्यासाठी येणारा भविष्यकाळ फार भयानक असू शकतो. कारण तुमच्या राजकारणाचा इतिहास सर्व महाराष्ट्रातील बहुजनांनी पाहिलेला आहे. तुम्ही महादेव जानकर यांच्या रासप मधून बाहेर पडला. तो पक्ष सोडला व भाजप मध्ये गेलात, पुन्हा भाजप सोडला व बहुजन वंचित आघाडी मध्ये गेलात. आता बहुजन वंचित आघाडी सोडून पुन्हा भाजपमध्ये आलेला आहात व आमदार झाला आहेत. या सर्व पळा-पळी करताना आपण समाजाला सांगितलेलं कारण म्हणजे धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे, हेच आहे. त्यामुळे जर भविष्यात राजकारण करायचं असेल तर, हा प्रश्न अगोदर मार्गी लागलाच पाहिजे. तरच धनगर समाज व बहुजन समाज तुम्हाला डोक्यावर घेईल, अन्यथा आपली धडगत बरी होणार नाही. आपण  सत्तेसाठी व राजकारणासाठी अनेक पक्ष बदललेले असले तरी ही अजून बहुजन समाजाचा आपणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मात्र आपण करत असलेल्या या भंपकव क्तव्यामुळे बहुजन समाजाचा हा सकारात्मक दृष्टिकोन गमावून बसाल. शिवाय आपण भारतीय जनता पक्षाचे आमदार असला तरी, या पक्षात  पुढे-पुढे करणाराची गत काय झालेली आहे किंवा केलेली आहे? याची पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, विनोद तावडे, गोपीनाथ मुंडे ही मोठी-मोठी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे नको त्या वादात न पडता, आपण ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आमदार झाला आहोत व ज्या शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कारण वेळ कोणासाठी ही थांबत नाही. नको त्या गोष्टी करण्यात व वादाचे मुद्दे उकरून काढण्यात बघता-बघता कधी सहा वर्षे निघून जातील हे समजणार ही नाही.
शरद पवारांसारख्या व्यक्तीवर टीका करण्याचे काम आपले नसून ते काम देवेंद्र फडणवीस यांचे आहे, कारण त्यांना काही ही करून मुख्यमंत्री व्हायचं आहे. तसेच त्यांनी काही ही केले व काही ही बोलले तरी माफ आहे. याचे कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे. आपण किती ही खटाटोप केला तरी मुख्यमंत्रिपदापर्यंत किमान भाजपमध्ये असताना तरी जाणार नाही,  ही काळया दगडावरची रेष आहे. त्यामुळे जर आपणास भविष्यामध्ये चांगले व दमदार राजकारण करायचे असेल तर बहुजन समाज व  धनगर समाज यांना न्याय द्यावाच लागेल, नाहीतर आपणास राजकारणात कोणी ही विचारणार नाही, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळालेल्या आमदारकीचा उपयोग योग्य पद्धतीने आणि शांत डोक्याने बहुजन समाजासाठी करावा, जेणेकरून संपूर्ण बहुजन समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील व त्यांच्या जोरावर आपण भविष्यातली राजकीय वाटचाल जोमाने करू शकाल, यात तिळमात्र शंका नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies