Type Here to Get Search Results !

आरोग्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याची शपथ


आरोग्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याची शपथ
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची शपथ देतानाच महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याची शपथही घेतली. राज्यात असलेल्या २२४ तंबाखू मुक्ती केंद्रांच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेमार्फत घोषवाक्यही दिले जाते. ‘तरुणांना तंबाखू उद्योगांच्या तावडीतून वाचवा आणि त्यांना तंबाखू व निकोटीनच्या वापरापासून दूर ठेवा’ असे घोषवाक्य या वर्षासाठी देण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात २६ हजार ४१८ शाळा आणि २४४२ आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करण्यात आल्या आहेत. तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत सुमारे ६ कोटी ५४ लाख २४ हजार ४३० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. २२४ तंबाखू मुक्ती केंद्राच्या माध्यमातून ५ लाख ४१ हजार ४१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून २५ हजार २७५ जण तंबाखू मुक्त करण्यात आले आहेत. जुलै २०१८ पासून राज्यात हुक्का बंदी देखील करण्यात आली आहे. गेली चार वर्ष राज्यामध्ये मौखिक कर्करोग तपासणी शिबिरे देखील घेण्यात आली आहेत.
आज येथील शासकीय निवासस्थानी आरोग्यमंत्र्यांनी तंबाखू विरोधी शपथ देताना… मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन अशी शपथही घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies