Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय महामंडळ सभेसाठी शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा : असिफ मुजावर ; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची उद्या कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महामंडळ सभा

आसिफ मुजावर
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते या सभेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आसिफ मुजावर
यांनी बैठकीमध्ये दिली. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावेल, असा विश्वास पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी  यांनी बोलताना व्यक्त केला. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय कार्यकारी मंडळ, जिल्हा तालुका कार्यकारी मंडळ, मनपा-नगरपालिका कार्यकारी मंडळाची सभा दरवर्षी होते. या वर्षी कोल्हापूर येथील मार्केट यार्डच्या पाठीमागे मेननच्या शेजारी असलेल्या गणेश लॉनमध्ये ही  सभा होणार आहे.
दुपारी साडेबारा वाजता खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या सभेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री प्राजक्त तनपुरे, मंत्री राजेंद्र यड्रावकर, खास. संभाजीराजे, खास. प्रा. संजय मंडलिक, खास. श्रीनिवास पाटील, खास. धैर्यशील माने यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापती या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 
प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महानगरपालिकेच्या व नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होणे अत्यावश्यक आहे. अंशदायी पेन्शन योजनेतून शिक्षकांची रक्कम कपात केली जात आहे.  काही जिल्हा परिषदेमध्ये याचा हिशोब लागत नाही. २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धरणाच्या अध्यादेशात दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या चुकीच्या अध्यादेशामुळे राज्यातील अनेक शिक्षक विस्थापित झाले आहेत. आंतरजिल्हा बदली पासून अनेक शिक्षक वंचित आहेत. केंद्रप्रमुखांची ५०  टक्के पदे सेवाज्येष्ठतेनुसार तर उर्वरित ५० टक्के पदे शिक्षकांच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरावीत. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत शिक्षकांना एमएससीआयटी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ द्यावी. शिक्षकांना बीएलओ सह इतर अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे. सातव्या वेतन आयोगातील त्रुटींचे निराकरण करून खंड २ प्रसिद्ध करावा. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू कराव. विशेष शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी. अशा प्रमुख मागण्या नेत्यांकडे करण्यात येणार आहेत. 
तरी आटपाडी तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना या महामंडळ सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आसिफ मुजावर यांनी केले आहे. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा प्रवक्ते नारायण कदम, जिल्हा सदस्य सचिव हणमंतराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष  रसिक सपाटे, सुनील गायकवाड तालुका सरचिटणीस श्रीकांत मोरे, कोषाध्यक्ष शरद चव्हाण, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर खिलारी,तालुका प्रसिद्धी प्रमुख अजिनाथ बुधावले, तालुका उपाध्यक्ष प्रशांत कडव, तालुका नेते नितीन वाघमारे, शहाजी वाक्षे, विजय राजमाने, भरत कदम, राजेंद्र बदडे इत्यादी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies