बहुजनांनी शिक्षणाची कास धरावी : प्रा.यशवंत गोसावी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

बहुजनांनी शिक्षणाची कास धरावी : प्रा.यशवंत गोसावी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : पुर्वीच्या विषमतावादी प्रथेने  बहुजनांना दीर्घकाळ शिक्षणापासून वंचित ठेवले. शिक्षणाअभावी बहुजनांचे सर्व स्तरावर मोठे शोषण झाले. तेंव्हा बहुजनांनी शिक्षणाची कास धरून स्वतःचा उद्धार करावा. असे प्रतिपादन प्रा.यशवंत गोसावी यांनी केले. आटपाडी येथील संविधान जनजागृती सप्ताह व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यान मालेचे दुसरे विचारपुष्प प्रा.गोसावी यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर माळी होते.
 पुढे बोलताना प्रा.गोसावी म्हणाले, विषमतावादी समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोतम संविधान लिहले. संविधान लिहण्यापूर्वी बाबासाहेबानी प्रचंड पुस्तके वाचली. प्रचंड वाचन, दीर्घकाळ अभ्यासातून सक्षम संविधानाची निर्मिती केली आहे. हे केवळ शिक्षणातून शक्य झाले. तेंव्हा बहुजनांनी शिक्षणाची कास धरावी. डॉ.आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. पिणारा गुरगुरणारच. तेंव्हा बहुजनांनी शिक्षणाच्या वाघिणीचे दूध प्यावे. तेंव्हाच स्वतःसह समाजाचा सर्वांगीण उद्धार साधता येईल.
आजच्या युवा पिढीने मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक हाताळून पाश्चात्य राष्ट्राच्या लोकांना जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत पोहचविले. आणि आम्ही मात्र फुकट वेळ घालवीत आहोत यांकडे युवकांनी गांभीर्याने पहावे. मानवी शरीर बळकटीसाठी जसे दर्जेदार अन्नाची गरज आहे, तसेच सदृढ मनासाठी चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची गरज आहे. तेंव्हा सुशिक्षितांनी घरोघरो पुस्तकांच्या ग्रंथालये उभी करावीत. बहुजन समाजात वाचन चळवळ उभी करावी तेंव्हाच भावी पिढीला सदृढ व चांगला समाज देता येईल. आटपाडीतील शाहू-फुले-आंबेडकर विचारमंचाप्रमाणे समाजातील इतर घटकांनी प्रबोधनाचे कार्यास शक्य ते सहकार्य करीत योगदान द्यावे. तरच आंबेडकरी चळवळ जीवंत राहील.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर माळी म्हणाले, शिक्षण हाच समाज विकासाचा मूलभुत पाया आहे. शिक्षणाची कास धरल्यास बहुजनांच्या जीवनातील अंधकार नाहीसा होण्यास मदत होईल. प्रत्येक कुटुंबाने पुस्तकांचा संग्रह करावा. मुलांना शिक्षण द्यावे. पुस्तके वाचायला द्यावीत.
यावेळी विचारमंचाचे अध्यक्ष राजेंद्र खरात, रणजित ऐवळे, संताजी देशमुख, मधुकर माळी, लक्ष्मण मोटे, दीपक खरात, सुरेश मोटे, सनी पाटील, दादा कदम यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकिरण जावीर, प्रास्ताविक राजेंद्र खरात, तर आभार रमेश टकले यांनी मानले. भोजनदान वसंतराव सरक यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Advertise