श्री दानम्मादेवी यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी खबरदारी घ्यावी : अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

श्री दानम्मादेवी यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी खबरदारी घ्यावी : अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मादेवी यात्रा दिनांक 24 नोव्हेंबरपासून सुरू होऊन ती 27 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिल्या.
गुड्डापूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गुड्डापूर देवस्थान ट्रस्टचे चंद्रशेखर गोब्बी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शौचालय सुविधा, पार्किंग आदि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगून अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुड्डापूर व शेजारील गावातील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य व ताडी विक्री अनुज्ञप्ती / आस्थापना यात्रा कालावधीत बंद ठेवण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. देवस्थानच्या मार्गावरील रस्ते वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यात्रेसाठी लावण्यात येणाऱ्या स्टॉलमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर नियंत्रण ठेवावे. मंदिर आवारात व बाहेरील भागात आवश्यक सीसीटीव्ही लावावेत.
यात्रा कालावधीत आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा असे सांगून अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, यात्रा कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवावा त्यामध्ये व्यत्यय येऊ नये याची खबरदारी घ्यावी. मंदिर व मंदिर परिसरात केलेल्या वीज जोडण्या, जनरेटर कनेक्शन याची इलेक्ट्रीशियनकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र घ्यावे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था सुसज्ज ठेवावी. आरोग्य विभागाने आवश्यक ती तयारी ठेवावी. ॲम्बुलन्स, आवश्यक औषधे उपलब्ध करून ठेवावीत. अग्नीशामक विभागाने आवश्यक अग्नीरोधक व्यवस्था करावी. संबंधित यंत्रणेच्या संपर्क क्रमांकाची पुस्तिका तयार करून ती पोलीस विभाग, गटविकास अधिकारी व देवस्थान ट्रस्टकडे द्यावी. पुरवठा निरीक्षक यांनी यात्रेमध्ये स्टॉलवर असणारे दुधाचे व अन्य पदार्थ यामुळे विषबाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, यात्रेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
फोटो ओळ : गुड्डापूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
No comments:

Post a Comment

Advertise