Type Here to Get Search Results !

उमेदवारी अर्ज माघार घेऊन संजयकाकांनी हरण्याची नामुष्की टाळावी : पडळकर यांचा सल्ला


उमेदवारी अर्ज माघार घेऊन संजयकाकांनी हरण्याची नामुष्की टाळावी : पडळकर यांचा सल्ला
 लक्ष्मणराव उर्फ एल.जी. खटके
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सांगली : भाजपचे कार्यकर्ते माझे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना नोटिसा काढण्यातच भाजपचा वेळ जाईल, त्यामुळे  संजयकाका पाटील यांनी  अर्ज मागे घेऊन  हरण्याची नामुष्की टाळावी असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी संजय पाटील यांना केला. मिरज येथे उमेदवारीच्या प्रचारार्थ आले असताना पडळकर यांच्या  प्रचारात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना  नोटीस काढण्यात येत असल्याच्या कारणावरून  ते बोलत होते.
यावेळी बोलताना पडळकर पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू आहे आणि जिल्ह्याचे राजकारण आता एका टोकाला गेले आहे. खासदार संजयकाका यांचे आता लीड कमी आले असून,  त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. सांगली जिल्ह्यातील भाजपची सीट ही तीन नंबरला गेलेली सीट आहे. ही परिस्थिती वास्तववादी आहे. भारतीय जनता पार्टीमधील अनेक सहकारी माझ्या सोबत आहेत.
भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रामाणिकपणे काम केले असल्यामुळे भारतीय जनता पार्टीतील पदाधिकाऱ्यांची माझ्याबद्दलची भूमिकाही वेगळी असणार आहे. भारतीय जनता पार्टीने काही तालुकाध्यक्ष यांना नोटीस काढली आहे असे समजले आहे. पण ते तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणारे तालुकाध्यक्ष आहेत. बूथ रचनेपासून संघटनेपर्यंत चांगले काम केले आहे. ते माझ्यासोबत आले म्हणून त्यांना खुलासा करावा, असे नोटीस काढण्यात आले आहे. असे अनेक पदाधिकारी आहेत जे माझं काम करणार आहेत. भाजप अशा कोणाकोणाला नोटीस काढणार आहे? निवडणूक सोडून रोज त्यांना हेच उद्योग करावे लागतील.
बूथ कार्यकर्त्यापासून, पदाधिकाऱ्यांचे अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत, ते माझे काम करणार आहेत. त्यांना इथून पुढे पंधरा दिवस फक्त नोटीस काढण्यात भाजपचा वेळ जाणार आहे. त्याला दुसरा पर्याय राहणार नाही. भाजपच्या संजयकाकांना कोणीही मतदान करायला तयार नाही. गावगाड्यात कुठेही गेले तरी दोन-चार, पाच-दहा माणसाच्या वर माणूस गोळा होईल असे झाले आहे. अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे. त्यांनी आता जास्त खालच्या पातळीवर ती न जाता आठ तारखेला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे, त्यांनी तो अर्ज माघारी घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे असे माझे मत आहे.
भारतीय जनता पार्टीची ही सीट निवडून आणण्यासाठी पृथ्वीराज देशमुख यांना सगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्या पद्धतीने ते प्रयत्न करत असतील परंतु ही सीट शंभर टक्के निवडून येणार नाही. वंचित आघाडीचे वारे आता गावा-गावापर्यंत आणि घराघरापर्यंत गेलेले आहे. जे बांधावरच्या शेवटच्या माणसाचा म्हणणं आहे. पानपट्टी, हॉटेल, पारावरच्या सर्वांचं म्हणणं आहे ते वंचित आघाडी आहे. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या भावना म्हणजे वंचित आघाडी आहे. ज्या 70 वर्षापासून त्यांना कुठेही व्यक्त करता आल्या नाहीत त्या भावना आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी वंचित आघाडी तयार झाली आहे, ती वंचित आघाडी राज्यामध्ये एक वेगळा पर्याय देते आणि हे शंभर टक्के खरे आहे. लोकसभेमध्ये मी सांगलीमधुन आणि बाळासाहेब आंबेडकर सोलापुर आणि आपल्यामधून निवडून येणार आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही.
आता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभेचे चित्र राज्यातील बदलेल. राजकीय तज्ञ, विश्लेषक, नेतेमंडळी, पक्ष या सर्वांचे अंदाज चुकणार आहेत. ही निवडणूक सर्वसामान्य लोकांना एक वेगळा पर्याय देते, स्वाभिमान देते आणि त्यांना  एका चांगल्या माणसांना मतदान करण्याची सत्तर वर्षांनंतर संधी देते. ही संधी लोक  कोणीही दवडणार नाहीत. ज्या लोकांनी आतापर्यंत आमची मते घेतली, त्यांनी आता आम्हाला मते द्यायला पाहिजेत. वंचित आघाडीला समाज नाही, आज प्रत्येक समूहातला पिचलेला माणूस आहे, त्याला राजकीय संधीमध्ये स्थान मिळालेले नाही, अशा लोकांची वंचित बहुजन आघाडी आहे. अशा लोकांना नेतृत्व देण्याचे काम प्रकाश आंबेडकर करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies