Type Here to Get Search Results !

तरुणांच्या हातून देशसेवा,समाजकार्य घडावे : अमरसिंह देशमुख; देशमुख महाविद्यालयात दीक्षांत समारंभ संपन्न

तरुणांच्या हातून देशसेवा,समाजकार्य घडावे
अमरसिंह देशमुख : देशमुख महाविद्यालयात दीक्षांत समारंभ संपन्न
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/वार्ताहर : भारताचे भविष्य तरुणांच्या हाती असून आपण मिळविलेल्या पदवीचा,शिक्षणाचा उपयोग देशहिताकरिता आणि समाजसेवेसाठी करावा. याकरिता दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमास अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मत दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य अमरसिंह बापू देशमुख यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या बीजभाषणामध्ये व्यक्त केले. आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
महाविद्यालयाच्या परिसरातून दीक्षांत समारंभाची मिरवणूक ढोलताशांच्या गजरासह प्रमुख पाहुणे, मान्यवर, स्नातक, प्राध्यापक,विद्यार्थी यांच्या शिस्तबध्द संचलनातून कार्यक्रमस्थळी पोहोचली. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रा.तेजश्री सावंत यांनी पसायदान गायन करुन कार्यक्रमात मंगलमय वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुभाष कारंडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य प्राचार्य,डॉ. रमेश कुंभार होते. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय लोंढे, महाविद्यालय परीक्षा विभागप्रमुख,डॉ. शिवाजी विभुते मंचस्थानी होते. कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव उल्हास शिंदे, निरीक्षक हणमंत पवार, निरीक्षक अशोक चौगुले,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड.रामचंद्र इनामदार व दिनेश देशमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विजय लोंढे यांनी केले.
अमरसिंह देशमुख पुढे म्हणाले की,महाविद्यालयातील आजचा कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. आज तुकाराम बीज आणि कार्यक्रमाचे बीजभाषण असा सुवर्णयोग लाभल्याने आपण भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत काम करीत आलो,परंतु आजच्या कार्यक्रमाने या शिक्षणक्षेत्रात आणखी काम करण्याची जबाबदारी वाढवली आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारवंतांचा आहे. त्यामुळे महान व्यक्तींचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आहे. आजचा काळ हा निश्चितच काळजी वाटण्यासारखा असला तरी आजच्या काळात आपली जबाबदारी देशहिताच्या आणि समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असणे आवश्यक आहे. समाजास आपणाकडून खूप अपेक्षा असतात. त्यांची परिपूर्तता करण्यासाठी आपणास काळाची उत्तरे शोधावी लागतील. महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून शिक्षण देण्याची आणि घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु यात नेमकं काय घडतयं ? असा प्रश्न उपस्थित केला व यावर विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आज शिक्षणाचा प्रसार खेडोपाड्यात झाला आहे. अलिकडील काळात विशेषकरुन महिला आणि मुली विविध क्षेत्रात आपले विशेष प्राविण्य दाखवीत आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. पदवी प्राप्त केलेल्या प्रत्येक मुलांनी सातत्याने आपल्या हातून चांगले कार्य घडावे यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे विशेष आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. सुभाष कारंडे म्हणाले की, शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यामुळेच आज हे विद्यार्थी पदवी प्राप्त करू शकले आहेत. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या शैक्षणिक धोरणांवर प्रकाश टाकला. बदलत्या विद्यापीठ कायद्यानुसार पदवीचे महत्व वाढविण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत देशातील उच्चशिक्षणामध्ये झालेल्या बदलांचा,प्रगतीचा आलेख आकडेवारीनुसार नेमकेपणाने व सविस्तरपणे मांडला. पदवी प्राप्त स्नातकांनी पुढील काळात शैक्षणिक आव्हाने पेलण्यासाठी सक्षम होण्यास सांगितले.
यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते पदवी प्राप्त स्नातकांना प्रमाणपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. यामध्ये कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाचे आभार डॉ. शिवाजी विभुते यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताचे सादरीकरण करुन करण्यात आला.
यावेळी भवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंतराव देशमुख, वत्सलादेवी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विजयमाला मोकाशी, बालविकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक दीपक खरात, आटपाडीतील प्रतिष्ठीत नागरिक,महाविद्यालयातील समारंभ समितीचे सर्व सदस्य,संयोजक,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका, संस्थेतील शिक्षक-शिक्षिका,स्नातक,प्रशासकीय सेवक, एन.सी.सी. कॅडेटस, एन.एन.एसचे स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिंनी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies