Type Here to Get Search Results !

शरद पवार यांची माढ्यातुन माघार; विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी होणार फायनल : माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भाजपशी जवळीक पडली विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पथ्यावर


शरद पवार यांची माढ्यातुन माघार; विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी होणार फायनल 
माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भाजपशी जवळीक पडली विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पथ्यावर 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचे अधिकृतपणे जाहीर केले होते. मात्र त्यांच्या निर्णयामुळे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील गट यांचा चांगलाच नाराज झाला होता. त्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यामुळे पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून पक्षात तरूणांना संधी मिळावी, म्हणून आपला नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघात उमेदवारी देण्याचे फायनल झाले आहे. 
आज पुण्यातील बारामती होस्टेलवर पवारांनी पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा जागेबाबत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठक झाली. माढ्याला विजयसिंह मोहिते पाटलांना डावलल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे पवारांना निवडणुकीत दगाफटका होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर पवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय जाणकारांनी केली आहे. शरद पवारांनी दीर्घकाळ विचारविनिमय करून माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे गेल्या वेळी जाहीर केलेल्या पवारांनी अचानक घूमजाव करून पुन्हा रिंगणात उतरण्याची घोषणा करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही संघर्ष करुन विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला होता. आता ऐनवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांना डावलून पवारांच्या नावाची घोषणा झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
विजयसिंह मोहिते पाटील यांचा गट जरी त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झाला असला तरीही त्यांना तालुक्यात विरोध भरपूर आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे तेथून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार संघामध्ये आपल्याला उमेदवारी मिळणार या हेतूने मतदार संघ पिंजून काढला होता. मोहिते पाटील यांना विरोध होत असल्याचे लक्षात आल्यावर यांनी चक्क पवारांना उभे राहण्याची गळ घालून पक्षांतर्गत विरोधकांना धोबीपछाड दिला. मोहिते-पाटील गटाचा आता विजय झाल्याचे दिसत आहे. याच बैठकीत मावळमधून पवारांचे नातू पार्थ पवार यांची उमेदवारी पक्की करण्यात आली आहे. पक्षाने तरूणांना संधी दिली पाहिजे,हे कारण त्यासाठी देण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies