Type Here to Get Search Results !

रूग्णांची अडवणूक करणाऱ्या रूग्णालयांवर दंडात्मक कारवाई करा – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे



रूग्णांची अडवणूक करणाऱ्या रूग्णालयांवर दंडात्मक कारवाई करा – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे


अमरावती : स्त्री रूग्णालयाचे कामकाज पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक निधी, लिक्वीड ऑक्सिजनसाठी टँकर, मेळघाटसाठी रूग्णवाहिका, तसेच कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. कोरोनाबाबत तपासणी दर व उपचार दर निश्चित करून देण्यात आले आहेत.  


तथापि, जादा दर आकारून रूग्णांची अडवणूक करणा-यांवर कठोर भूमिका घेऊन दंडात्मक कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी येथे केले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.


जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा घेताना आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले की, जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 आहे. तो एका टक्क्याहून कमी व्हावा, यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत.  जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्के आहे, तो 10 टक्क्यांहून कमी झाला पाहिजे. त्यासाठी तपासण्यांची संख्या एक हजारपर्यंत वाढवावी. प्लाझ्माची सुविधा सुरू करण्यात आली, पण त्याबरोबरच त्याचा सक्सेस रेटही तपासावा. त्यासाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडून तपासून घ्यावे. प्लाझ्माबाबत व्यवहारात गैरप्रकार घडू नयेत यासाठी दरनिश्चिती करण्यात आली आहे.   


खाटांच्या उपलब्धता व इतर सुविधांसाठी वेळोवेळची माहिती अचूक देणारा डॅशबोर्ड असावा. लिक्विड ऑक्सिजनबाबत भिलाई येथून एक आणखी टँकर उपलब्ध व्हावा, यासाठी कार्यवाही करण्यात येईल. स्टोरेजसाठी आवश्यक टँकचे काम तत्काळ पूर्ण करावे. त्याचप्रमाणे, ड्युरा सिलेंडरची व्यवस्था कार्यान्वित करून घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.


स्त्री रूग्णालयाचे कामकाज पूर्णत्वास जाण्यासाठी 20 कोटी रूपये निधी व मेळघाटसाठी रूग्णवाहिका द्याव्यात, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केली. त्याबाबत आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, स्त्री रूग्णालयासाठीचा निधी तत्काळ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे, शासनाकडून 250 रूग्णवाहिका खरेदी करण्यात येत आहेत. त्यातील रूग्णवाहिका मेळघाटसाठी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील. मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर व इतर पदभरतीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मनुष्यबळासाठी सतत प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies