Type Here to Get Search Results !

जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात; अमरावतीतही सुरुवात जिल्हा रूग्णालयात प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा पालकमंत्र्यांचा हस्ते शुभारंभ


जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात; अमरावतीतही सुरुवात
जिल्हा रूग्णालयात प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा पालकमंत्र्यांचा हस्ते शुभारंभ
अमरावती :  कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. अमरावतीत ही सुविधा उपलब्ध झाल्याने उपचारांना गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. या अनुषंगाने प्लाझ्मा बँकही  निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
अमरावती जिल्हा रूग्णालयात प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा शुभारंभ पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. आशिष वाघमारे, डॉ. अमित क्षार, तंत्रज्ञ सचिन काकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह डॉक्टर, पारिचारिका आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत स्थानिक स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण होऊन अहवाल मिळण्याच्या प्रक्रियेला गती आल्यानंतर आता प्लाझ्मा थेरपी यंत्रणाही उपलब्ध झाली आहे. उपचाराच्या अनुषंगाने अद्ययावत यंत्रणा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. महाविकास आघाडी शासनाने जगातली ही सर्वात मोठी सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली आहे. ही सुविधा अमरावतीतही सुरु होत आहे, हा अभिमानास्पद क्षण आहे. कोरोनाच्या संकटाशी आपण सर्व मिळून आपण विविध प्रयत्नांतून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या उपचारात कोरोनावर लक्षणांनुसार विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी रुग्णाला मिळणार आहेत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर ज्याप्रमाणे रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे  येतात व रक्तदानाने रुग्णांचा जीव वाचवतात. त्याचप्रमाणे, ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करता येते. आता कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबून रूग्णांना चांगली सेवा देत आहे. प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारीही आपणास पार पाडावी लागेल, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी रूग्णालयातील रॅपिड टेस्ट यंत्रणा व जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० ला भेट देऊन तेथील सुविधांचीही पाहणी केली.
प्लाझ्मा थेरपीविषयी
राज्यात विविध वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार ही सुविधा देण्यात आली आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा  रुग्ण निवडला जातो. एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण  www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies