म्हसवडच्या “सिध्दनाथ” मंदिरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 15, 2020

म्हसवडच्या “सिध्दनाथ” मंदिरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द

 


म्हसवडच्या “सिध्दनाथ” मंदिरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द

माणदेश एक्सप्रेस न्युज

म्हसवड/अहमद मुल्ला : अनेक राज्यातील लाखों भाविकांचे कुलदैवत व म्हसवड चे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचे घटस्थापनेपासून श्रींच्या विवाह सोहळ्या पर्यंतचे भाविकांच्या, मानकऱ्यांच्या, सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती श्री सिध्दनाथ देवस्थानचे अध्यक्ष अजित गुरव, उपाध्यक्ष हरिभाऊ गुरव व सचिव दिलीप कीर्तने (गुरव) यांनी दिली.

मंदिराच्या इतिहासात आजपर्यंत चालत आलेल्या पूर्वापार पारंपरिक रिवाजनुसार दिवाळी पाडव्या दिवशी श्रींची घटस्थापना, हळदी समारंभ बारा दिवसाचे नवरात्र (उपवास), नगरप्रदक्षिणा, भाऊबीजे दिवशी दिवाळी मैदान, त्यानंतर बाराव्या दिवशी म्हणजे तुलसी विवाह दिवशी रात्री बारा वाजता श्रींचा विवाह सोहळा आदी सर्व कार्यक्रम असंख्य भाविक, मानकरी, सेवेकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होत होते. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला असून वरील सर्व धार्मिक कार्यक्रम मंदिराच्या आतच ठराविक, मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावयाचे आहेत.

मंदिराकडे येणारे सर्व रस्ते बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तमाम भाविक मानकरी, सेवेकरी, नगर प्रदक्षिणा घालणारे आबालवृद्ध या सर्वांनां मंदिरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. याठिकाणी म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश वाघमोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून तमाम भाविक, मानकरी, सेवेकरी, नगरप्रदक्षिणा घालणारे आबालवृद्ध या सर्वांनी शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करून सिध्दनाथ देवस्थान ट्रस्टला व व्यवस्थापनास सहकार्य असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise