Type Here to Get Search Results !

मेंढपाळ बांधवांच्या संरक्षणविषयक मागण्यांचा सकारात्मक विचार करणार : गृहमंत्री अनिल देशमुख



मेंढपाळ बांधवांच्या संरक्षणविषयक मागण्यांचा सकारात्मक विचार करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

माणदेश एक्सप्रेस टीम


मुंबई : राज्यातील मेंढपाळ बांधवांचे जे संरक्षणविषयक प्रश्न आहेत त्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मंत्रालय येथे  केले. मेंढपाळांना संरक्षण देऊन त्यांच्यावरील हल्ले थांबविण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.


यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, माजी आमदार सर्वश्री प्रकाश शेंडगे, हरिभाऊ भदे, रामराव वडकुते, रमेशभाऊ शेडगे, पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंग, अति.महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके व इतर अधिकारी उपस्थित होते.


मेंढपाळ बांधवावर होणाऱ्या हल्ल्याबाबत शासन गंभीर असून त्यांच्या मागण्याबाबत निश्चित सकारात्मक विचार केला जाईल. हल्ल्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे याकरिता पोलीस यंत्रणेला, स्थानिक पोलीस स्टेशनला योग्य त्या सूचना देण्यात येतील. मेंढपाळ वस्तीला असतील त्याठिकाणी गस्त घालणे, त्यांची विचारपूस करणे याबाबतही पोलीस विभागाला सांगण्यात येईल. मेंढपाळ बांधवांच्या यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याबाबत योग्य ती कायदेशीर तपासणी करुन जे गंभीर स्वरुपाचे नसतील ते गुन्हे मागे घेण्याविषयी विचार करु. मेंढपाळ बांधवांनी केलेल्या तक्रारीबाबत दखल घेण्याविषयी पोलिसांना सूचना देण्यात येतील. शस्त्र परवानाबाबत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया संबंधितांनी पूर्ण करावी. त्यानंतर नियमांनुसार कार्यवाही होईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले.


राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले हा अजामीनपात्र गुन्हा व्हावा. तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी आग्रही मागणी केली. त्यावर सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहू असे श्री. देशमुख यांनी सांगितले.


शस्त्र परवाना, मेंढ्यांची चोरी, तक्रारीची योग्य दखल, विशेष कायदा, याबाबत उपस्थितांनी या बैठकीत आपले प्रश्न मांडून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी उत्तम जानकर, गणेश हाके, कु. सक्षना सलगर, भारत सोन्नर, विकास लवटे, अभिमन्यू कोळेकर तसेच मेंढपाळ बांधवांचे प्रतिनिधी संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies