भारती हॉस्पीटल येथील आरटीपीसीआर लॅबव्दारे तासात चाचणी अहवाल देण्यासाठी प्रयत्नशील : राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

भारती हॉस्पीटल येथील आरटीपीसीआर लॅबव्दारे तासात चाचणी अहवाल देण्यासाठी प्रयत्नशील : राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदमभारती हॉस्पीटल येथील आरटीपीसीआर लॅबव्दारे तासात चाचणी अहवाल देण्यासाठी प्रयत्नशील : राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : भारती हॉस्पीटल येथे सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबमध्ये दररोज 400 ते 500 कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्याचा अहवाल 24 तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.


भारती हॉस्पीटल सांगली येथे नूतन आटीपीसीआर लॅब, ब्लड बँक-प्लाझ्मा थेरपी व टेलिमेडीसीन कक्षाचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. देशमुख आदि उपस्थित होते.


ते पुढे म्हणाले, भारती हॉस्पीटल सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबमुळे रूग्णांना लवकर कोरोना चाचणी अहवाल मिळणार असून जिल्हा प्रशासनासही याची मदत होणार आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी भारती हॉस्पीटल सांगली येथे 15 मार्च 2020 पासून डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये संशयित व पॉझिटीव्ह कोविड रूग्णांच्या उपचारासाठी 160 बेड्ची सुविधा आहे. यामध्ये 40 बेड्स आयसीयु आहेत. आयसीयुमध्ये 15 व्हेंटीलेटर व 10 हाय फ्लो नसल कॅन्युल्स आहेत. 6 केएल ऑक्सिजन प्लँटच्या माध्यमातून सर्व 160 बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे. ऑक्सिजन बॅकअपसाठी 110 जम्बो सिलेंडर आहेत.  


आरटीपीसीआर चाचणी बरोबरच, प्लाझ्मा थेरपी, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट, डायलेसिस, डेडिकेटेड सोनाग्राफी, डिजीटल एक्सरे फॅसिलीटी, सीटी स्कॅन आदि सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, आत्तापर्यंत 1  हजार 417 संशयित व 1 हजार 95 कोविड पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार करण्यात आले असून 729 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपचाराखाली 111 रूग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.


तत्पूर्वी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्टेशन चौक सांगली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise