शिक्षक दिन विशेष लेख : शिक्षक हाच राष्ट्राचा खरा शिल्पकार : राजेंद्र पाडवी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

शिक्षक दिन विशेष लेख : शिक्षक हाच राष्ट्राचा खरा शिल्पकार : राजेंद्र पाडवीशिक्षक दिन विशेष लेख : शिक्षक हाच राष्ट्राचा खरा शिल्पकार : राजेंद्र पाडवी


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. गुरू-शिष्याच्या पवित्र बंधनाला दृढ करणारा,शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.


शिक्षण हेच विकासाचे खरे साधन आहे. आणि यात शिक्षकांचे भूमिका फार मोलाची आहे. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा एक महत्त्वाचा घटक आहे.विद्यार्थ्यांना संस्कारांचे, जीवनाचे धडे देऊन देशाचा एक चांगला नागरिक बनविण्याचे काम शिक्षक करीत असतो. आजही खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर, दुर्गम भागात डोक्यावर छप्पर नाही, खोल्यांना भिंती नाही, शिकविण्यासाठी आवश्यक साहित्य नाही, भौतिक सुविधा नाही अशा परिस्थितीत, प्रसंगी पदरमोड करून विद्यार्थ्यांना शिक्षित करणारे शिक्षक आजही आहेत.  


आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे अमृतसिंचन करणारे, फुरंगटून कोपऱ्यात बसलेल्या मुलांना हसवण्यासाठी शिकवत असलेला धडा बाजूला ठेवून छानशी गोष्ट सांगणारा शिक्षक सवंगडी होतो. त्यांच्या भावभावना समजून घेणारा जिवलग होतो. यामुळेच वयाने कितीही वाढलो तरी शाळेतील शिक्षक हे आठवतात. नात्याची इतकी सुरेख गुंफण खचितच कुठे पाहायला मिळेल. भविष्यातील डॉक्टर,  इंजिनिअर, तत्त्वज्ञ, लेखक, शास्त्रज्ञ, पुढारी, विचारवंत तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यामागे शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान शिकवीत नाही तर संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती, आदर, अनेक नव-नवीन गोष्टी,जगण्याची कला शिकवीत असतो. म्हणूनचं शिक्षकांना राष्ट्राचे आरसे म्हटले जाते.


 (Teachers are the mirror of the Nation.) वर्तमानातील 'शिक्षक' हा केवळ अध्यापनकर्ता न राहता ते 'मार्गदर्शन', समुपदेशन' देखील आहेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व जितके विनयशील, संपन्न तितका परिणाम विद्यार्थ्यांचा प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रेरणेवर होत असतो. म्हणूनचं तत्वज्ञान कितीही बदलले अध्ययन, अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्व कमी होणार नाही. शिक्षक हाच राष्ट्राचा खरा शिल्पकार आहे.

राजेंद्र पाडवी

शिराळा. 


No comments:

Post a Comment

Advertise