कोरोनाच्या उच्चाटनासाठी सामाजिक संस्थानी योगदान द्यावे-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 23, 2020

कोरोनाच्या उच्चाटनासाठी सामाजिक संस्थानी योगदान द्यावे-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी कोरोनाच्या उच्चाटनासाठी सामाजिक संस्थानी योगदान द्यावे-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोरोनावर मात करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांच्यामधील समज, गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांच्या माध्यमातूनही प्रबोधन होणे खूप महत्वाचे आहे. सामाजिक संस्थांनी आपआपल्या क्षमतेनुसार याकामी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.


राजमती भवन, नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना आयोजित 'मिशन - कोविड कनेक्ट' या उपक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. बी.डी. बांडे, दीपक पाटील आदि उपस्थित होते.


ते पुढे म्हणाले की, स्वयंसेवी संस्थानी क्षमतेनसार व उपलब्ध असलेल्या संसाधनानुसार किमान कोविड केअर सेंटर तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, त्याचबरोबर मनुष्यबळ उपलब्ध असेल तर डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. तसेच मोठ्या हौसिंग सोयायट्यानीही छोटे छोटे कोविड केअर सेंटर सुरू केल्यास त्याचा फार मोठा फायदा होईल. समाजातील सर्व लोकांना प्रवृत्त करून अशा प्रकारच्या सुविधा गावोगावी, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संघटनानी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सुरू करण्यात आली आहे


यामध्ये आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्वयंसेवक हे सर्वजण घरोघरी जाऊन कोरोनाच्या बाबतीत असणाऱ्या शंका, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची लक्षणे असणारे रूग्ण शोधून त्यांना लवकरात लवकर उपचार देण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रूग्णांनी अंगावर आजार न काढता वेळेत उपचार घेऊन आजारातून मुक्त व्हावे. कोणीही घाबरून जाऊ नये. कोरोना रूग्णांचा माणसिक तणाव दूर होण्याच्या दृष्टीने समुपदेशन करण्यासाठी गावोगावी पोहोचेल अशी हेल्पालाईन सुरू करण्यात येणार आहे.  मोबाईल डिस्पेन्सरी हा उपक्रम धारावी मध्ये राबविण्यात आला त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातही जैन संघटनेकडून असा उपक्रम राबविला तर त्याचा मोठा फायदा होईल.

 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. बी. डी. बांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रास्ताविकात शांतिलाल मुथ्था म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. प्रत्येक शहरात उपचार उपलब्ध होण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने जागृती करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी तसेच प्रशासनावरील भार हलका करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. एन. डी. बिरनाळे तर दीपक पाटील यांनी आभार मानले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise