मृत्युदर कमी करण्यास प्राधान्य : पालकमंत्री जयंत पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 4, 2020

मृत्युदर कमी करण्यास प्राधान्य : पालकमंत्री जयंत पाटील


 

मृत्युदर कमी करण्यास प्राधान्य : पालकमंत्री जयंत पाटील

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने सतर्क व अखंड कार्यरत राहून येथील मृत्युदर कमी करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  या बैठकीसाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत आदी उपस्थित होते.


पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात निधीची कमतरता पडणार नाही. आवश्यक तो निधी प्रशासनाकडे दिला जाईल. जिल्ह्यातील रूग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होईल याचीही सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात कोविड आणि इतर आजारांच्या अनुषंगाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. वैद्यकीय रिक्तपदे भरण्याबाबत शासन सकारात्मक असून ही पदे लवकरच भरली जातील. आटपाडी आणि जत तालुक्यांसाठी अधिकची ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करण्याबरोबरच अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठाही करण्याबाबत श्री. पाटील यांनी निर्देश दिले. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून आवश्यकतेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहनही केले. तत्पूर्वी या बैठकी अगोदर पालकमंत्र्यानी शिराळा येथे जाऊन कोरोना विषयक स्थितीचा आढावा बैठकीव्दारे घेतला.


कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, गरीब, सामान्य रुग्णाला रेमडिसीविअर इन्जेक्शन मोफत देता येतील का याचा प्रशासनाने आढावा घ्यावा, त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांकडून लावण्यात येणाऱ्या पीपीई किटच्या अतिरिक्त किंमतीकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना केली. तर जत आणि आटपाडी तालुक्यांसाठी आणखीन दोन ॲम्बुलन्स देण्यात याव्यात अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी केली. तत्पुर्वी कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी व बाधीतांवर वेळेत उपचार होण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी  39 रुग्णालये ताब्यात घेण्यात आली असून त्याव्दारे रूग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिली.  


या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी  विजया यादव तसेच सर्वश्री विवेक आगवणे, बाबासाहेब वाघमोडे, अरविंद लाटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise