आरोग्य विभागाच्या ढिसाळपणामुळे चोपडीतील शेतकरी कुटुंब हवालदिल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 3, 2020

आरोग्य विभागाच्या ढिसाळपणामुळे चोपडीतील शेतकरी कुटुंब हवालदिल


आरोग्य विभागाच्या ढिसाळपणामुळे चोपडीतील शेतकरी कुटुंब हवालदिल 


सांगोला : सांगोला तालुक्यातील चोपडी गावातील गरोदर महिला नेहमीच्या तपासणीसाठी १६ जुलैला पतीसोबत दिघंची येथील डॉक्टरांकडे गेली होती. तेथील महिला डॉक्टरने तपासणी करून एक दिवसासाठी दवाखान्यात दाखल करून घेतले.  


दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाल्यानंतर हे दांपत्य घरी परतले. नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार चालू असताना २५ तारखेला दिघंचीतील संबंधित महिला डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह असल्याची बातमी कळाली.


चोपडी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हालचाली करत सदर कुटुंबाची भेट घेऊन विलगीकरणात राहण्यास सांगितले. सोबतच त्या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही विलगीकरणात राहण्यास सांगितले. एकूणच शेतीवर आधारित असणारे हे संपूर्ण कुटुंब आपल्या घरामध्येच आहे. 


पुढील दोन दिवसामध्ये कुटुंबातील पाच सदस्यांचे स्बाव घेण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेले इतरही नागरिक चांगलेच धास्तावले होते. लवकरच त्यांचा रिपोर्ट येईल आणि एकदाचा सोक्षमोक्ष लागेल म्हणून सर्वजण वाट पाहत होते. परंतु आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आज सहा दिवस झाले तरी रिपोर्ट आले नाहीत. 


संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असताना ऐन मशागतीच्या काळात सर्व शेतीकामे ठप्प आहेत. मनस्तापाबरोबरच मोठ्या आर्थिक नुकसानीला त्याना सामोरे जावा लागत आहे. संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावात असताना आरोग्य विभागाची निष्क्रियता संताप आणणारी आहे. 


वारंवार आरोग्य विभागाकडे चौकशी करून कुठलीही ठोस माहिती भेटत नाही. तालुका व जिल्हा आरोग्य विभागात समन्वयाचा प्रचंड अभाव असून या भोंगळ कारभाराचा परिणाम ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. 


दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाला याचं गांभीर्य कधी येणार? असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित करण्यात येत आहे.


शासकीय लॅबमधूनच रिपोर्ट येण्यास वेळ लागत असून आज उद्या रिपोर्ट येतील.  
तालुका वैद्यकीय अधिकारी, सांगोला  


No comments:

Post a Comment

Advertise