Type Here to Get Search Results !

संपादकीय : दूध दरवाढ आंदोलन की, दूध ओत आंदोलन...!!!


संपादकीय : दूध दरवाढ आंदोलन की, दूध ओत आंदोलन...!!!

महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढऊन द्यावेत, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने व त्यांच्या सहयोगी पक्षानी मिळून काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे. 


पंढरपूर मध्ये भाजपच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, महादेव जानकर व स्वाभिमानी शेतकरी संघटने मधून भाजपमध्ये जाऊन मंत्री झालेले, सदाभाऊ खोत यांनी पंढरपूर मध्ये चंद्रभागेला जाऊन दुधाचे दरत वाढ करावी, यासाठी विठ्ठलाला दुधाने अंघोळ घातली. त्याच बरोबर पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी स्वतः दुधाने अंघोळ केली, व आपले चारित्र्य दुधासारखे स्वच्छ धुऊन घेतले. त्याच बरोबर सांगली जिल्ह्यातील आटपाडी परिसरामध्ये तरुण तडफदार, नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनी गायीच्या दुधाने गाईलाच आंघोळ घातली आहे. 


अशा पद्धतीने ज्या गाईचा हेच लोक गोमाता म्हणून आदर करतात, त्या गोमातेच्या दुधाला अमृत समजतात. त्यांनीच संपूर्ण जगाला हे दाखवून दिलेल आहे की आम्ही कागदाच्या नोटासाठी आमच्या गोमातेचे दूध खुले आम रस्त्यावरती ओतून देऊन दुधाशी गद्दारी करत आहोत. काल ज्यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन करून गोमातेचे दूध म्हणजे अमृत रस्त्यावर आणून ओतून दिलं, तोच पक्ष आणि त्या पक्षाच्या इशार्यानवर नाचणारे महादेव जानकर व सदाभाऊ खोत हे लोक एका वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरवाढीचा कायदा केला असता तर आज ही वळ त्यांच्यावर आली नसती. 


त्यांच्या हातातून सत्ता निघून गेल्यावर दूध दरवाढीच्या नावाने शिमगा करायला चालू केला आहे. आपण पण हे ही तात्पुरते मान्य करूया, की ते विरोधी पक्षात आहेत, त्यामुळे ते सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करून शेतकऱ्यांच्या दुधाला दर वाढ देऊ इच्छितात. पण हे आंदोलन करत असताना हे ही दाखवून देतात की आम्ही गोमातेच्या दुधाशी कशा पद्धतीने खिलवाड करू शकतो. दूध दरवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या या सर्व शहाण्याना या गोष्टीचं भान असायला पाहिजे होतं की, आंदोलन करत असताना जे दुध आपण रस्त्यावरती ओतून देत आहोत, ज्या दुधाने आपण गाईंना अंघोळ घालत आहोत, ज्या दुधाने निर्लज्जा सारखे स्वतः अंघोळ करीत आहोत, ज्या दुधाने कोरोनामुळे देवळात लपून बसलेल्या विठ्ठलाला अंघोळ घातली जाते, तेच दूध जर वाड्या-वस्त्या मध्ये झोपडपट्टीमध्ये कोरोणाच्या दहशतीने अनेक आर्थिक व भुकेच्या संकटाशी झुंज देत असणारा गरीब व सर्वसामान्य समाज आहे. त्यांना दूध वाटप करून किंवा कोरोनाच्या भीतीने अन्नपाण्याविना तडफडणाऱ्या गरिबांच्या मुला-मुलींना व सार्वजनिक ठिकाणी वावर करणाऱ्या पाळीव प्राण्यांना जर या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी व भाजपप्रणीत कार्यकर्त्यांनी दूध पाजले असते, तर रस्त्यावरती व्यर्थ जाणाऱ्या दुधाचा ‘सदु’पयोग झाला असता. 


पण यांना आंदोलन करून राजकारण करायचं असल्यामुळे गायीच्या दुधाबरोबर यांनी एक प्रकारे मस्ती केल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्याला सर्वसामान्य आणि समजदार नागरिकांचा अजिबात विरोध नाही. पण दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या नावावर केलेली दुधाची नासाडी कोणत्याच माणसाला शोभनीय वाटणार नाही. या दूध आंदोलनामध्ये मूळ भाजपचे नसलेले परंतु सत्तेच्या अमिषा पोटी भाजपमध्ये गेलेले सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासारख्या नेत्यांना व भाजप मध्ये आमदार व पदावर कार्यरत असलेल्या सर्वाना भाजपवाल्यांनी अशा प्रकारची आंदोलने करायला लावून, त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. म्हणूनच दूध दर वाढीसाठी दुधाची वाटेल तशी नासाडी करण्याचे आंदोलन या नेत्यांच्या खांद्यावर सोपवून देवेंद्रजी लांबून यांची परीक्षा पहात आहेत. 


या नेत्यांनाही याची चांगलीच कल्पना आहे की जर आपण देवेंद्रजींचा आदेश पाळला नाही, तर किंवा त्यांनी घेतलेल्या परीक्षेत पास झालो नाही तर, आपले भविष्य पुन्हा अंधकारमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिचारे सत्तेच्या हव्यासापोटी तिकडे वेड्यासारखे धावत आहेत. वेड्यासारखे बडबडत आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारू शकतात की 1 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्र तुमच्याच हातात होती. तुम्हीच सर्व मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय हुकुमशहा प्रमाणे घेत होता. मग शेतकऱ्यांच्या गाई-म्हशीच्या दूधांचा दर आज आपल्याला जो अपेक्षित आहे, त्याच्याहीपेक्षा का वाढवला नाही..? पण देवेंद्रजींच्या पक्षात असणाऱ्यांना व बाहेरून सत्तेच्या हव्यासापोटी पक्षात येणाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांना जाब विचारायचा अधिकार नाही. जर का एखाद्याने उलट प्रश्न विचारला, तर निवडणुकीत त्याची काही धडगत नाही. म्हणून नाईलाजाने हे सर्वजण तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत असतात. 


या सर्व नेत्यांना माहीत आहे की आपण आपले नेते देवेंद्रजी जे सांगतात ते व्यवस्थित ऐकलं पाहिजे, ते जे काम करायला लावतात ते काम गुमान केलं पाहिजे, नाहीतर देवेंद्रजीना जर राग आला तर आपली अवस्था ' ना घाट का,न घर का ' अशी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या सर्व नेत्यांच्या मनात देवेंद्रजी यांच्या विषयी आदर युक्त भीती निर्माण झालेली आहे. या आदरयुक्त भीती पोटी हे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत. पण या नेत्यांना हे अजूनही कळालेलं नाही की आपण जे करतोय, त्यामुळे आपली किंमत पक्षात वाढण्याऐवजी कमी होत चाललेली आहे. 


त्यामुळे आपल्या पाठीमागे कोणीतरी देवाचा राजा देवेंद्र आहे म्हणून, समाजात कसेही सैरभैर वागून, बोलून, आंदोलने करून आपण आपले राजकीय अस्तित्व निर्माण करू शकत नाही. उलट त्या अस्तित्वाला सुरंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies