संपादकीय : अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त....... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 1, 2020

संपादकीय : अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त.......


संपादकीय : अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त.......
6 डिसेंबर, 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या लढ्यातील अग्रणी साहित्यकार, शाहीर, गायक, कवी व कलाकार यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतील अंधेरी येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या काव्यातून श्रद्धांजली अर्पण करताना म्हणतात....


" जग बदल घालुनी घाव !
  जग बदल घालुनी घाव....!
  सांगून गेले मला भीमराव...!!
गुलामगिरीच्या या चिखलात...!
रुतून बसला का ऐरावत...!!
अंग झाडुनी निघ बाहेरी....!
घे बिनीवरती धाव......!!
जग बदल घालुनी घाव...!
 सांगुनी गेले मला भीमराव....,!!


    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर त्यांचे उरलेले समाजपरिवर्तनाचे कार्य व विचार आपल्या साहित्याच्या, विचाराच्या व कर्तृत्वाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या निष्ठावंत अनुयायांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रणी आहे. त्यामुळे आज 1 ऑगस्ट, 2020 जयंती दिवसा पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त परिवर्तनाच्या व सामाजिक चळवळीच्या नावाखाली भरकटत चाललेल्या त्यांच्या अनुयायांना व दलित चळवळीच्या संधीसाधू अनुयायांना त्यांच्या विचाराची, साहित्याची व कार्याची ओळख व्हावी अशी अपेक्षा आहे. 


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट, 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात, वाटेगाव येथे झाला होता. शाळेत गेलेल्या अण्णा भाऊंना सवर्णांच्या कडून होणाऱ्या भेदभावाला व अपमानाला कंटाळून अवघ्या दीड दिवसात शाळा सोडावी लागली होती. त्याच अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या क्षेत्रात अमूल्य साहित्याचे योगदान देऊन 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह,12 पटकथा, 10 पोवाडे, नाटक,  लावणी साहित्य, यात्रा वर्णन इत्यादी साहित्य लिहिले आहे. मराठी साहित्यातील ते एक विद्यापीठ आहे. साहित्याच्या क्षेत्रातील जे विविध प्रकार आहेत, त्या प्रत्येक प्रकारात साहित्य लिहून आपले नाव करून गेलेला, ते एक कोहिनूर हिरा आहेत. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातल्या अनिष्ट चाली, रुढी व प्रथा स्त्रियांच्या वर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण, गरीबी, बेकारी, राजकारण, द्वेष, हेवेदावे, मजुरांचे शोषण या विषयावर अनुभवनिष्ठ साहित्य लेखन केलेले आहे. आपल्या समाजाला भूकमारी पासून वाचवण्यासाठी सरकारच्या विरुद्ध विद्रोह करणारा फकीरा समाज परिवर्तनाचा नायक त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केला आहे. 


भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतावरील उच्चवर्णीययांचे शासन अण्णाभाऊ साठे यांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट, 1947 रोजी म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई येथे 20 हजार लोकांचा मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चामध्ये त्यांनी ,'ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है' अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला होता. ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले यांना आपले गुरु मानून त्यांच्या आदर्श विचारांवर व कार्यावर पाऊल ठेवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून केलेला आहे. पहिल्या दलित साहित्य संमेलनामध्ये ते छातीठोकपणे सांगतात की, या जगाच्या निर्मितीमध्ये श्रमिक, दलित व कामगारांचे महत्वपूर्ण योगदान आहे. 


ते आपल्या भाषणात म्हणतात की,' पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित व कामगार लोकांच्या तळहातावर ठरलेली आहे.' अशा पद्धतीने ते  दलित व श्रमिकांच्या वेदनांचे प्रकटीकरण साहित्यातून समाजासमोर ठामपणे व्यक्त करतात, आणि जुनाट रूढी व परंपरांना छेद देतात. अण्णाभाऊ साठे दलित साहित्यिकाच्या सामाजिक जबाबदारी संदर्भात म्हणतात की,' दलित लेखकांना हिंदूच्या अत्याचारापासून समाजाला मुक्त करणेची व त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, कारण दीर्घकालीन रूढी, परंपरा व अंधश्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.' त्यामुळे साहित्यकारांनी साहित्याच्या माध्यमातून जुनाट, बुरसटलेल्या विषमतावादी व अंधश्रद्धा युक्त रूढी-परंपरावर साहित्याच्या माध्यमातून आसूड ओढून,  त्याच्यापासून समाजाला मुक्त केले पाहिजे. साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या कथा व कादंबऱ्यामध्ये भारतीय स्त्रियांचा सन्मान केला आहे. 


मनुवादी पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांचे होणारे शोषण, त्यांची जगण्याची धडपड, संघर्ष, जीवाची घालमेल यांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडून स्त्रियांना सामाजिक न्याय, समता व सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या साहित्यातील नायक हा त्याच्यावर होणार्या, अन्याया विरुद्ध बंड उभे करतो, विद्रोह करतो. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाणेच अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचे पूजक आहेत आणि अन्याय अत्याचार व शोषण यांच्याविरुद्ध बंड न करता, शंड होऊन जीवन जगणाऱ्या प्रवृत्तीच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रमाणे आसूड मारणारे ही आहेत.


 ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांना आपले गुरू मानून, त्यांचे अपूर्ण कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तेच कार्य अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या, विचारांच्या व कार्यांच्या माध्यमातून आपणापर्यंत आणून ठेवले आहे. त्यामुळे या सर्व महापुरुषांची, त्यांच्या विचारांची व कार्याची एकसंघ मूठ बांधून, सर्व बहुजन समाजातील लोकांनी आपल्या जातीचे रंग, झेंडे, प्रतीके व खोटा अभिमान गुंडाळून ठेवून, समाज परिवर्तनाचा हा लढा तन-मन-धन अर्पण करून पुढे घेऊन जाणे, आजच्या काळाची गरज आहे, अन्यथा पुढच्या पिढ्या आपणास कधी ही माफ करणार नाहीत. त्यांना आपण विशिष्ट विचारांच्या, कार्यांच्या किंवा जातींच्या चौकटीत मर्यादित न करता  विशाल व व्यापक दृष्टिकोनातून आदर्श घेऊया व सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची वाटचाल करूया. एवढीच अपेक्षा आहे. साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंती शताब्दी वर्षाच्या निमित्त विनम्र अभिवादन...!No comments:

Post a Comment

Advertise