Type Here to Get Search Results !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणगृहे, बालगृहांमध्ये आवश्यक सर्व खबरदारी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

माणदेश एक्सप्रेस न्युज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणगृहे, बालगृहांमध्ये आवश्यक सर्व खबरदारी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  निरीक्षणगृहे व बालगृहांमधील मुला-मुलींची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. तेथे राहणाऱ्यांची सातत्याने आरोग्य तपासणी करावी. थोडी जरी लक्षणे आढळली तरी त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही सोशील डिस्टन्सिंग व स्वच्छतेविषयक सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महिला जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय पुनर्वसन समिती, जिल्हा नियंत्रण समिती, जिल्हा परिविक्षा समिती, बाल कल्याण समिती बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा सरकारी वकील प्रविण देशमुख, जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. एच. बेंद्रे, विधी अधिकारी दिपीका बोराडे, संरक्षण अधिकारी दिपक पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

निरीक्षणगृह, बालगृहांमधील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे आवश्यक आहे. त्यासाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षण द्यावे. यासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढावीत. बालगृहातील व निरीक्षणगृहातील मुला-मुलींच्या पुनर्वसनासाठी संवेदनशिलपणे प्रयत्न व्हावेत. नगरपालिका, नगरपरिषदांकडील राखीव निधीच्या खर्चाबाबत सातत्याने आढावा घेण्यात यावा. केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्वला या योजनांच्या कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेऊन ज्या संस्थाचे काम असमाधानकारक आहे, अशा संस्थांचा अहवाल शासनास सादर करावा. महिला संस्थामध्ये दाखल असणाऱ्या पिडीत महिलांना व्होकेशनल प्रशिक्षण देऊन त्यांचे नोकरी अथवा स्वयंरोजगाराव्दारे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत समुपदेशकांमार्फत लॉकडाऊनमुळे स्वगृही परतू न शकलेल्या श्रमिकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील निवारागृहांमध्ये समुपदेशन सेवा पुरविण्यात आली. तसेच मिरज व सांगली शहरामधील वारांगणांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies