Type Here to Get Search Results !

तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनते


तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनते.



पुणे : हा सायरस पूनावाला म्हणजे मॅड पारशी. आज जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना जोपासणारा, उत्तमोत्तम स्पोर्ट्सकारचा आणि प्रायव्हेट जेटचा मालक सायरस पूनावाला हा मूळचा घोडेवाला. 

स्टड फार्म हा त्याचा मूळ धंदा. घोड्यांच्या शर्यती हा त्याचा छंद आणि घोड्यांची पैदास हा व्यवसाय. ब्रिटिश गेले आणि भारतीयांना घोड्याच्या शर्यतीत फारसं स्वारस्य उरलं नाही. धंदा डबघाईला आला. लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत पसरलेल्या जमिनी टिकवायच्या, शेकडो घोडे जगवायचे ही काही खायची गोष्ट नव्हती. घोड्यांचा धंदा बंद करण्याचा विचार सायरस पूनावालाने साठच्या दशकातच चालवला होता. दरम्यान त्याने स्पोर्ट्सकार बनवून विकण्याचा दुबळा प्रयत्न केला. पण तेव्हा असल्या शोभादर्शी उद्योगाला अमेरिका आणि युरोपमध्ये वाव होता. भारतात देशी श्रीमंतांची मानसिकता लोकल फ्लॅमबॉयन्स विकसित करण्याची नव्हती.




पूनावाला आपले शर्यतीतून बाद झालेले घोडे हाफकिनला डोनेट करायचा. लस तयार करण्यासाठी घोड्यांचं रक्त बेस म्हणून वापरलं जातं. डोनेट करता करता पूनावालाने हाफकिनच्या एका पशुंच्या डॉक्टरकडून यातलं इंगित जाणून घेतलं आणि त्याच्या लक्षात आलं की आधुनिक वैद्यकशास्त्रात त्याचे घोडेच त्याला पैसा मिळवून देणार. घोड्याच्या रक्तापासून अँटिटॉक्सिन तयार करण्याच्या जुन्या उद्योगाला त्यांनी आधुनिक विज्ञानाची जोड दिली. १९६६ साली पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटची पायाभरणी केली. घरचे घोडे होतेच. सिरम इन्स्टिट्यूटने अक्षरशः लशींचा रतीब घालायला सुरुवात केली. १९७४ साली सिरम इन्स्टिट्यूटने घटसर्पावरची एक लस तयार केली. डांग्या खोकल्यावर औषध काढलं. १९८१ साली त्यांची सर्पदंशावरची प्रतिबंधक लस लोकप्रिय झाली. आज १०० हून अधिक देशांत सिरम इन्स्टिट्यूट लशी पुरवतं. जगातल्या प्रत्येक दोन बालकांपैकी एकाला जी लस टोचली जाते ती सिरम इन्स्टिट्यूटची असते असं आत्मविश्वासाने पूनावाला सांगतात.




जो साठच्या दशकात घोड्यांची पैदास करत होता तो आता वर्षाला ५० कोटी लशींचे डोस विकत भारतातला चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस आहे तर जगातला १०० वा. पूनावालांची संपत्ती १३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. सिरम इन्स्टिट्यूटने युरोपातल्या आघाडीच्या दोन कंपन्या विकत घेतल्यात. १० हजार कोटींचा महसूल वर्षाला तयार करणारी ही कंपनी वर्षाला दीड अब्ज डोस तयार करू शकते. म्हणूनच जग संशोधनात कितीही पुढे असलं तरी शेवटी जगाला वाचवणारी लस भारतातच तयार होणार हे नक्की. कारण ऑक्सफर्डची जी लस तयार होते आहे तिच्या उत्पादनाचा करार पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटसोबत आहे. लोणावळ्याच्या स्टड फार्मवर तुम्हाला कधी बेफाम धावणारे घोडे दिसले तर त्यांना नमस्कार करायला विसरू नका. कारण या घोड्यांच्या अंगात दौडणारं रक्तच जगाला वाचवणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies