Type Here to Get Search Results !

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे : अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम


कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे : अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम
माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. खाजगी रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर सर्व सोयीयुक्त सुविधा उपलब्ध होण्यावर मर्यादा येत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे राहिले असून सर्व प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी केले.

तहसिल कार्यालय मिरज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, वॉलनेस हॉस्पीटल मिरज चे डॉ. नाथानीयल ससे, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. निरगुंडे, डॉ. दिक्षीत, तहसिलदार रणजित देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

 अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम म्हणाले, वॉलनेस हॉस्पिटलमध्ये आवश्यक सर्व यंत्रणा उपलब्ध असून या ठिकाणी  कामकाज सुरळीत चालावे, त्यामध्ये कोणती कसूर राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासकीय समिती स्थापन केली आहे. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स कमिटीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ही समिती वेळोवेळी मार्गदर्शन करून आढावा घेणार आहे. गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजने वॉलनेस हॉस्पीटल मधील  असणाऱ्या सर्व स्टाफला मेडिकल ट्रिटमेंटचा प्रोटोकॉल, कोरोना पेशंट ट्रिट करताना डॉक्टर्स, नर्सेस, शिपाई, स्वच्छता सेवक यांनी स्वत: काय काळजी  घ्यावयाची आहे याचे ट्रेनिंग दिलेले आहे. 

याशिवाय आवश्यकता असणाऱ्या स्टाफची विशेषत: फिजीशियनच्या बाबतीत महानगरपालिका आयुक्त यांनी मेस्मा अंतर्गत आदेश काढले आहेत. तसेच  व्हेन्टिंलेटरही उपलब्ध करून दिलेले आहेत. या हॉस्पीटलमध्ये सद्या एकूण 88 बेडस् ची सुविधा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली आहे. ती पुढील काळात 100 पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच या व्यतिरिक्त फिजीशियन असोसिएशनने एमओयु केला असून त्या अंतर्गत कोविड रूग्णांसाठी सशुल्क असे 50 बेडस् ही उपलब्ध आहेत. 

यावेळी डॉ. नाथानियल ससे म्हणाले, वॉलनेस हॉस्पीटल मिरज मध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमची सेवा पूर्ण ताकदीने कार्यरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या हॉस्पीटलला पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची सेवा करण्याची संधी दिली आहे. या ठिकाणी  संशयित रूग्णांसाठी 12 बेडस्, संशयित रूग्ण ज्यांचे रिपोर्ट यावयाचे आहेत अशा स्त्री व पुरूष यांच्यासाठी 24 बेडस्, पॉझिटिव्ह रूग्णांसाठी 36 बेडस्, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे अशा रूग्णांसाठी 8 बेडस् व गंभीर व व्हेन्टिलेटर्सची गरज भासणाऱ्या रूग्णांसाठी 8 बेडस् ची सुविधा उपलब्ध केली आहे. 

यासाठी जिल्हा प्रशासन व शासकीय मेडिकल कॉलेजने पाठबळ दिलेले आहे. डॉ. वॉलनेस यांनी प्लेगच्या साथीमध्ये महत्वपूर्ण काम केले आहे. आता कोरोनाच्या साथीमध्येही हे हॉस्पीटल महत्त्वपूर्ण योगदान देईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies